लम्पीमुळे एकाच दिवसात पाच गायी दगावल्या, नगर जिल्ह्यात मृत जनावरांची संख्या 26वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नगर जिल्ह्यात लम्पी रोगाची व्याप्ती वाढत असून, शनिवारी एकाच दिवसात पाच गायी दगावल्या आहेत. या लम्पीमुळे मृत पावलेल्या जनावरांची संख्या 26 झाली आहे. तर, एकूण लम्पीग्रस्त जनावरांची संख्या 663 झाली असून, यापैकी 313 जनावरांनी लम्पीवर मात केली आहे. 350 जनावरांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात लम्पीचा विळखा घट्ट होत आहे. पशुसंवर्धन विभागाने तातडीने जनावरांचे लसीकरण सुरू केले असले, तरी दैनंदिन आकडेवारीत लम्पीग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. शनिवारी एकाच दिवसात पाच गायी दगावल्या आहेत. जिल्ह्यातील 711 गावे ही लम्पी रोगाच्या संपर्काच्या पाच किलोमीटरच्या परिघात येत असून, या ठिकाणी तातडीने सर्व जनावरांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या गावांतील 7 लाख 83 हजार जनावरांचे लसीकरण करण्यात येणार असून, आतापर्यंत पशुसंवर्धन विभागाने 3 लाख 75 हजार जनावरांचे लसीकरण पूर्ण केले आहे. तर, तालुका पातळीवर 6 लाख 86 हजार लम्पी विरोधी लस पोहोच करण्यात आली आहे.

राज्यातील पहिले जनावरांचे क्वारंटाईन सेंटर पाथर्डीत

कोविडप्रमाणे लम्पी रोगाचा मुकाबला करण्यासाठी जनावरांचे विलगीकरण करण्यात येणार आहे. याबाबत राज्य पातळीवरून सूचना आल्या असून, नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात राज्यातील जनावरांचे क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात आले आहे. पाथर्डी तालुक्यातील तिसगावच्या बळीराजा फाउंडेशनने बळीराजा लम्पी क्वारंटाईन सेंटर सुरू केले आहे. या ठिकाणी लम्पीबाधित जनावरांवर मोफत उपचार करण्यात येणार आहेत.