गाडी बाजूला घे म्हटल्याच्या रागातून पोलिसाच्या डोक्यात मारला सिमेंटचा गट्टू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोटारीजवळ उभी केलेली दुचाकी बाजूला घे म्हटल्याच्या रागातून एकाने साथीदारांना बोलावून घेत पोलीस अंमलदाराच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून गंभीररित्या जखमी केले. ही घटना 18 सप्टेंबरला सकाळी सव्वा दहाच्या सुमारास लोहगावमधील एका पेट्रोलपंपाजवळ घडली.

या प्रकरणी कालिदास खांदवे, माउली खांदवे (रा. लोहगाव) यांच्यासह इतर तिघांविरुद्ध विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पी. आर. मोटे असे गंभीर जखमी झालेल्या अंमलदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमलदार मोटे विमानतळ पोलीस ठाण्यात नेमणुकीला आहेत.

18 सप्टेंबरला सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांनी धानोरी जकात नाका परिसरात मोटार पार्क केली होती. त्यावेळी गाडीनजीक दुचाकीस्वार आल्यामुळे त्यांनी संबंधिताला गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे आरोपी कालिदास खांदवे याने साथीदारांना बोलावून घेतले. मोटे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने त्यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून गंभीररित्या जखमी केले. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस.एन. लहाने तपास करीत आहेत.