लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रेमविवाहास नकार दिल्याने जोतिबा डोंगर परिसरातील गिरोली घाटात प्रेयसीचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः विष प्राशन केलेल्या प्रियकराचा सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेमिका ऋतुजा प्रकाश चोपडे (वय 21, रा. खोतवाडी, इचलकरंजी), कैलास आनंदा पाटील (रा. लिंगनुर, ता. कागल) अशी मृतांची नावे आहेत.

ऋतुजा चोपडे आणि कैलास पाटील हे नातेवाईक असून, तीन वर्षांपूर्वी कैलासने ऋतुजाला लग्नासाठी विचारले होते. त्यावेळी ऋतुजाच्या आई-वडिलांनी लग्नाला होकार दिला होता. मात्र, कैलास काही कामधंदा करीत नसल्याने तसेच दोघांमध्ये वयाचे मोठे अंतर असल्याने एक वर्षापूर्वी आई- वडिलांनी त्यांच्या लग्नाला नकार दिला होता. याचा राग मनात धरून कैलासने गिरोली घाटात काल सायंकाळी ऋतुजाचा गळा आवळून खून केला. त्यानंतर त्याने दोघांच्या नातेवाईकांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ‘गुडबाय’ असा मेसेज टाकून विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. कैलासला सीपीआरमध्ये उपचारास दाखल करण्यात आले होते. मात्र, आज सकाळी त्याचा मृत्यू झाला. ऋतुजाचे वडील प्रकाश चोपडे यांनी कोडोली पोलीस ठाण्यामध्ये याप्रकरणी फिर्याद दिली आहे.