
महाराष्ट्रात होऊ घातलेला वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प गुजरातला पळवून एक लाख मराठी बेरोजगार तरुणांचा रोजगार हिरावून घेतला. शिंदे-फडणवीस सरकारचा नाकर्तेपणा आणि केंद्रातील भाजप सरकारच्या दबावामुळे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने राज्यभरात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. वेदांताच्या या गुजराती लुटीच्या विरोधात शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात पुण्याच्या तळेगाव येथे आज शनिवार, 24 सप्टेंबर रोजी ‘जनआक्रोश आंदोलन’ केले जाणार आहे.
वेदांता-फॉक्सकॉनचा प्रकल्प राज्यातील ‘खोके सरकार’च्या नाकर्तेपणामुळे गुजरातला पळवला गेला. त्याविरुद्ध राज्यभरात आता संतापाचा उद्रेक होऊ लागला आहे. एक लाख तरुणांचे रोजगार बुडवणाऱ्या या गुजराती लुटीच्या विरोधात शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे.
वेदांता-फॉक्सकॉनचा सेमिकंडक्टर निर्मिती प्रकल्प ज्या भागात होणार होता त्या पुण्यातील वडगाव मावळ येथे मावळ पंचायत समिती कार्यालयासमोर शनिवारी सायंकाळी 4 वाजता ‘जनआक्रोश आंदोलन’ करण्यात येणार आहे. ‘आमचा रोजगार, आमचा हक्क’ असा नारा देत हजारो युवक-युवती या आंदोलनात सहभागी होणार आहेत.




























































