
लांडग्याच्या हल्ल्यात एक तरुण शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना पाथर्डी तालुक्यातील शेकटे गावात घडली. हल्ल्यात मल्हारी रंगनाथ घुले (वय 31) हा तरुण जखमी झाला आहे. विशेष म्हणजे लांडगा व घुले यांच्यात तब्बल वीस ते पंचवीस मिनिटे झटापट सुरू होती. या वेळी घुले यांनी लांडग्यांचा जबडा दाबून धरत आरडाओरडा केल्यानंर त्यांच्या मदतीला जवळच असलेले शेतकरी विष्णू बन्सी घुले आले. त्यांनी लाकडी काठीने लांडग्यावर हल्ला चढवत मल्हारी घुले यांची सुटका केली.
मल्हारी घुले हे आपल्या शेतात असताना शनिवारी सकाळी शेतातील जनावरांवर दोन लांडग्यांनी अचानक हल्ला केला. या वेळी घुले यांनी लांडग्यांना प्रतिकार करून हाकलून लावण्याचा प्रयत्न केला असता एक लांडगा पळून गेला. मात्र, दुसऱ्या लांडग्याने घुले यांच्या हाताला, तोंडाला, पोटाला चावे घेतले. या वेळी घुले यांनी लांडग्यांचा जबडा दोन्हीही हाताने पकडून ठेवत आरडाओरडा केला. त्यावेळी जवळच असलेले विष्णू घुले आले. त्यांनी या लांडग्याला पळवून लावले. या नंतर घुले यांना मछिंद्र पवार,बाळासाहेब घुले,संदीप पवार यांनी जखमी अवस्थेत पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणले. प्राथमिक उपचार करून त्यांना नगरला पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे.

























































