मुंबईतील तीनही गाई लम्पीमुक्त; गोवंशीय प्राण्यांचे लसीकरण पूर्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत लम्पीबाधित आढळलेल्या तीनही गाई लम्पीमुक्त झाल्या असून त्यांची प्रकृती उत्तम आहे, तर मुंबईतील सर्व गोवंशीय प्राण्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शिवाय पालिका आणि सरकारच्या माध्यमातून खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत असल्याने मुंबईकरांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी केले आहे.

राज्यात गोवंशीय प्राण्यांमध्ये लम्पी आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने खबरदारी घेण्याचे अनिवार्य बनले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेकडून आपल्या कार्यक्षेत्रात आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये गोशाळा व आजूबाजूच्या परिसरात विशेष खबरदारी घेण्यात येत असून मुंबईभरातील सर्व गोठे, तबेले आणि गोशाळांची तपासणी करण्यात येत आहे, तर पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून लम्पी प्रतिबंधक लसीकरण करण्यात येत आहे. दरम्यान, लम्पी चर्मरोग हा केवळ गाईंना होत असून आजपर्यंत म्हैसवर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. शिवाय हा रोग प्राण्यांपासून मानवाला संक्रमित होत नसल्याने घाबरण्याचे कारण नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ज्यांच्या जनावरांचे लसीकरण पूर्ण झालेले नाही त्यांनी पालिकेचा आपत्कालीन संपर्क क्रमांक 1916, 0222-5563284, 0222-5563285 व राज्य शासनाचा पशुवैद्यकीय सेवा संपर्क क्रमांक 1962 यावर संपर्क साधावा, असेही आवाहन डॉ. शैलेश पेठे यांनी केले आहे.

अशी आहेत लक्षणे

  • लम्पी आजार गोवंशीय प्राण्यांमध्ये होणारा संसर्गजन्य आजार आहे. याला कॅपरी पॉक्सही म्हटले जाते. डास, माशा, गोचीड, मल-मूत्र आदींच्या माध्यमातून आजाराचा प्रसार होतो. दूषित अन्न-पाण्याच्या सेवनानेही या आजाराचा प्रसार होतो.
  • लागण झालेल्या जनावरांच्या त्वचेवर गुठळय़ा तयार होऊन फोड येतात. यानंतर गुरांना ताप येणे, नाक वाहणे, जास्त लाळ गळणे, डोळे येणे अशी लक्षणे दिसतात. सध्या या आजारावर कोणताही उपचार नसून प्रतिबंधासाठी ‘गोटपॉक्स’ लस वापरली जात आहे.