मध्य रेल्वेचा लाचखोर अभियंता सीबीआयच्या जाळ्यात, 23 लाख रोख व 40 लाखांचे दागिने जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सीबीआयने मध्य रेल्वेच्या मुख्य यांत्रिक अभियंत्याला एक लाख रुपयांची लाच घेताना अटक केली आहे. आयआरएसएमई-1985च्या बॅचचा हा अभियंता असून या प्रकरणात त्याचा ड्रायव्हर आणि कोलकाता येथील खाजगी कंपनीच्या भागीदाराला देखील अटक करण्यात आली आहे. सीबीआयने आरोपींच्या मुंबई, कोलकाता, गाझियाबाद, नोएडा, डेहराडून, दिल्लीसह 10 ठिकाणच्या घरांची झडती घेतली. या लाचखोर अभियंत्याच्या आवारात झडती दरम्यान 23 लाख रोख व 40 लाख रुपयांचे हिऱ्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

सीएसएमटी येथील या मुख्य यांत्रिक अभियंत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकाता येथील एका खासगी कंपनीची बिले मध्य रेल्वेच्या यांत्रिकी विभागाकडे थकीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपी अभियंता हा मध्य रेल्वे, मुंबईच्या यांत्रिकी विभागाचा संपूर्ण प्रभारी होता आणि मध्य रेल्वेच्या यांत्रिक विभागाशी संबंधित सर्व निविदा आणि कामाचे कंत्राट त्याच्या अखत्यारीत येत होते. या अभियंत्याच्या सांगण्यावरून त्याचा अधिकृत चालक म्हणून काम करत असलेल्या व्यक्तीने वांद्रे येथे कार्यालय असलेल्या एका खाजगी कंपनीकडून 1 लाख रुपयांची लाच स्वीकारली. कोलकाता येथील खासगी कंपनीच्या भागीदाराच्या वतीने लाचेची रक्कम देण्यात आली होती.

यानुसार सीबीआयने सापळा रचत अभियंता आणि त्याच्या ड्रायव्हरला पकडले आणि लाचेची रक्कमही जप्त केली. यानंतर सीबीआयने कोलकाता येथील खासगी कंपनीच्या भागीदारालाही पकडले. पुढे सीबीआयने केलेल्या तपासात नोएडा, हरिद्वार, डेहराडून आणि दिल्ली येथे सुमारे 5 कोटींपेक्षा जास्त किमतीची जमीन आणि घरे. सिंगापूर आणि अमेरिकेमधील 3 परदेशी बँक खात्यांमध्ये सुमारे दोन लाख यूएस डॉलरच्या ठेवी, आरोपी आणि कुटुंबीयांच्या नावे एक एनआरआय बँक खाते आणि इतर बँक खाती सापडली आहेत. यात एका बँकेच्या लॉकरची ओळख पटली आहे. अटक केलेल्या सर्व आरोपींना आज सक्षम न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.