खंडणीप्रकरणी दाऊदचा हस्तक रियाज भाटीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अंधेरी येथील व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक रियाज भाटीला मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली, तर खंडणीच्या गुह्यात सलीम प्रुटचा सहभाग आढळून आला आहे. त्यामुळे सलीमचा ताबा घेण्यासाठी खंडणी विरोधी पथक एनआयए विशेष न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत.

वर्सोवा येथे व्यावसायिक राहत असून त्याची वर्षभरापूर्वी रियाजसोबत ओळख झाली होती. व्यावसायिक हे माटुंगा येथे पत्ते खेळण्यासाठी जायचे. रियाजच्या सांगण्यावरून सलीमदेखील एका जुगाराच्या क्लबमध्ये गेला होता. सुरुवातीला व्यावसायिक जिंकला मात्र त्याचे पैसे देण्यास सलीमने नकार दिला. मात्र दुसऱयावेळी सलीम पत्त्याचा डाव जिंकला तेव्हा त्याने पत्त्याच्या डावातील 62 लाख रुपये देणे असल्याचे व्यावसायिकाला सांगितले. तसेच आपण शकीलचा साडू आहे, जुगारात केलेला हिशोब बरोबर असून सदरचे पैसे देण्यासाठी धमकावत पैसे देण्यास सांगितले. त्यानंतर सलीमने रियाजची भीती दाखवल्याने व्यावसायिकाने त्याची महागडी गाडी सलीमला दिली. गाडी घेतल्यानंतर रियाझ हा 32 लाख रुपयांसाठी धमकावत असायचा. एका गुह्यात सलीमला अटक झाल्यावर एनआयएने व्यावसायिकाला चौकशीसाठी बोलावले होते. आपली ईडी आणि एनआयएमध्ये सेटिंग झाली असून 32 लाख रुपये देण्यास सांगितले. जर एनआयएने गाडीबाबत विचारणा केल्यास ती गाडी अशीच वापरण्यासाठी दिल्याचे सांगावे असे धमकावले. त्यामुळे व्यावसायिकाने रियाज आणि सलीमबाबत तक्रार केली नव्हती. त्यांतर रियाजने व्यावसायिकाला भेटत एनआयएला चौकशीत कोणतीही माहिती देऊ नये असे पुन्हा धमकावले होते. त्यामुळे व्यावसायिकाने वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार वर्सोवा पोलिसांनी हा गुन्हा खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग केला. वरिष्ठ निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे यांच्या पथकाने तपास करत रियाजला अटक केली.