
मुंबईचे मूळ निवासी आम्ही आहोत. मूळ मालक आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला ब्रिटिश सरकारने भूमी अधिकार (लॅण्ड राईट्स) दिले. धारावीत 2 लाख चौरस मीटरवर कोळीवाडा वसला आहे. तसे सीमांकन 2012-13 ला झाले आहे. मात्र, धारावी पुनर्विकास प्राधीकरण कोळीवाडय़ाचे सीमांकन केवळ 23 हजार चौरस मीटर असल्याचे सांगत आहे. आमच्याकडे भूमी अधिकार आहेत. धारावी गावाचे मालक आम्ही आहोत. त्यामुळे आम्हाला विश्वासात घेऊनच कोळीवाडय़ाच्या सीमांकनाप्रमाणे पुनर्विकास केला गेला पाहिजे, अशी मागणी धारावीतील कोळी समाजाने केली आहे.
मुंबईतील सात बेटांपैकी धारावी हे बेट होते. तशी नोंद सगळीकडे आहे. राणी एलिझाबेथ (पहिली) हिने या कोळी समाजाला भूमी अधिकार दिले होते, अशी माहिती कोळी समाजातील जुनीजाणती माणसे सांगतात. मात्र, म्बुंईचे शहरीकरण होताना धारावी गावाभोवती झोपडय़ांचा विळखा पडत गेला, अनधिकृत झोपडय़ा वाढत गेल्या आणि प्रदूषणामुळे खाडीतल्या मच्छीमारीवर गंभीर परिणाम झाला. 6 हजार लोकसंख्या असलेल्या धारावीत 2200 कुटुंबे आहेत. सध्या नव्या पिढीला नोकऱ्या नाहीत, मच्छीमारीसाठी खूप खोलवर आत जावे लागते. त्यासाठी बोटींचा खर्च वाढला आहे. कुटुंब वाढले आहे. महिला मच्छी मार्केटमध्ये मासे विकतात. मात्र, त्यांनाही सुविधा मिळत नाहीत, अशी व्यथा धारावी कोळी जमात ट्रस्टचे उपाध्यक्ष विल्सन कोळी यांनी व्यक्त केली.
साध्या सुविधांसाठीही आम्हाला हेलपाटे
धारावीत गेल्या 400 वर्षांपासून आम्ही राहत आहोत. इंग्रजांनी आम्हाला भूमी अधिकार दिले. कोळीवाडय़ाची मालकी बहाल केली. पण, आता हाच मालकी हक्क सरकार आणि महापालिका नाकारत आहे. कोळीवाडा ही आमची खासगी मालमत्ता आहे. असे असतानाही अशा वेळी साध्या साध्या गोष्टींसाठी आम्हाला महापालिकेकडे हेलपाटे मारावे लागतात. मात्र, अनधिकृत झोपडय़ा, इतर बांधकामे यांना हव्या असलेल्या सोयीसुविधा पटकन मिळतात. मात्र, संबंधित यंत्रणांकडे हेलपाटे मारूनही आमची कामे होत नाहीत, असा आरोप शिक्षक आणि ट्रस्टचे सचिव दिगंबर कोळी यांनी केला.
कोळी समाजाच्या मागण्या
- धारावीचे भूमी अधिकार आमचे आहेत ते आम्हाला मिळावेत. n सरकारने सीमांकन केले आहे तर मग त्याची कागदपत्रे आम्हाला द्या.
- कोळीवाडय़ांना एसआरएमधून वगळले आहे तर मग तसा जीआर सरकारने काढावा, तोंडी आश्वासने देऊ नये.
- धारावी गाव आमची खासगी मालमत्ता आहे. सीमांकनाप्रमाणे पुनर्विकास झाला नाही तर आम्हीच कोळीवाडय़ाचा पुनर्विकास करू.
…तर धारावीचा विकास आम्हीच करू
खासगी मालक हा स्वतःच्या जमिनीचा विकास हा स्वतःच करू शकतो. पुनर्विकास करताना धारावी कोळीवाडय़ाच्या सीमांकनाप्रमाणे पुनर्विकास करा. पण, धारावी पुनर्विकास प्राधीकरण झालेले सीमांकन नाकारत आहे. त्यामुळे वेळ आली तर ही कागदपत्रे आम्ही सर्वोच्च न्यायालयात सादर करू आणि धारावी गावाचा विकास स्वतःच करू, बिल्डर आणि आर्किटेक्टपण आमचाच असेल, असे धारावी कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष डॉमनिक कोळी म्हणाले.



























































