महिलांसाठी सुरक्षितता, न्याय, प्रगतीचे द्वार उघडू दे! शिवसेना उपनेत्या नीलम गोऱ्हे यांचे अंबाबाईला साकडे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुरक्षितता, विकास, न्याय आणि प्रगतीचे द्वार राज्यातील महिला तसेच जनतेसाठी उघडू दे, असे साकडे शिवसेना उपनेत्या डॉ. नीलम गोऱहे यांनी करवीरनिवासिनी अंबाबाईचरणी घातले.

शिवसेना महिला आघाडी आणि युवासेना आयोजित ‘बये दार उघड’ मोहिमेंतर्गत नीलम गोऱहे यांनी आज श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘राज्यात अनेकदा प्रवासात महिलांच्या प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत. मुली आणि महिलांच्या कौटुंबिक वादातून हत्या, स्त्र्ााrभ्रूण हत्येचे प्रमाण वाढतच चालले आहे. महिलांच्या अपहरणाच्या गुह्यात महाराष्ट्र देशात दुसऱया क्रमांकावर आहे. या पार्श्वभूमीवर लोकशाहीत महिलांना विकासाचा अधिकार मिळण्याची गरज आहे. यासाठी महिलांना स्वतंत्र बजेट मिळाले पाहिजे. महिला सुरक्षेसाठी प्रस्तावित असलेला शक्ती कायदा तातडीने व्हावा’, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वी सन 1995मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बये दार उघड’ असे आवाहन जगदंबेला केले होते. त्यावेळी मिळालेला प्रतिसाद आणि जनतेच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रात सत्तांतर झाल्याची आठवण करून देत त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून कोविडमुक्तीसह विविध जनकल्याणाच्या केलेल्या कामांचा आढावा यावेळी घेतला.

यावेळी उपनेत्या ज्योती ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, युवती सेनेच्या संपर्क संघटक दीपा पाटील, शीतल शेठ, पुणे शिवसेना महिला आघाडीच्या स्वाती ढमाले, विद्या होडे, शर्मिला येवले, कोल्हापूर महिला आघाडीच्या शुभांगी पोवार, मंगल चव्हाण, स्मिता सावंत, सांगली शिवसेना पदाधिकारी बजरंग पाटील, सुनीता मोरे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा

अंबाबाई दर्शनानंतर डॉ. गोऱहे यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याशी स्थानिक प्रश्नांवर चर्चा केली. कोल्हापूरकरांच्या शहर भागातील विविध प्रश्नांवर मार्ग काढून त्यांना आश्वासक वातावरण देण्यासाठी प्रयत्न करावेत. पुराच्या पाण्याने शहरात होणारे नुकसान आणि विविध प्रकारच्या उपाययोजना अधिक सक्षमपणे राबवाव्यात, अशा सूचनाही त्यांनी केल्या.

देवीचा प्रसाद आणि ज्योत पक्षप्रमुखांकडे सुपूर्द करणार

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा दसरा मेळावा शिवतीर्थावर होत आहे. या पार्श्वभूमीवर साडेतीन शक्तिपीठ असलेल्या परिसरातून महिला आघाडीच्या वतीने त्या-त्या परिसरातील महिलांचा आत्मसन्मान जागृत करून देवीचा प्रसाद आणि ज्योत उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार आहे, असेही डॉ. नीलम गोऱहे यांनी सांगितले.