
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे राज्यातील या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्यात येणार आहेत. नगर जिह्यातील 204 ग्रामपंचायतींवर यामुळे प्रशासक येणार आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार असलेल्या गावपुढाऱ्यांना आता आणखी काही महिने निवडणुकीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या सुमारे 7 हजार 649, नवनिर्मित 8 तसेच मागील निवडणुकांमधील समर्पित आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 अशा एकूण 8 हजार 675 ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या तयार करणे व प्रत्यक्ष निवडणूक यासाठी सुमारे 2-3 महिन्यांचा कालावधी आवश्यक असतो. त्यामुळे ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या मुदती जशा संपतील, तसतसे त्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
नगरमधील 204 ग्रामपंचायतींची ऑक्टोबर ते डिसेंबर 2022ला मुदत संपत आहे. यात श्रीरामपूर 6, शेवगाव 12, पाथर्डी 11, संगमनेर 37, कर्जत 8, कोपरगाव 26, अकोले 10, नेवासा 13, जामखेड 3, नगर 28, राहाता 12, पारनेर 16, राहुरी 11 आणि श्रीगोंदा 10 अशा 204 ग्रामपंचायतींची मुदत संपणार आहे.
































































