सूरतालांनी बांधलेलं जग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>मलिका अमरशेख

सारी दुःखे, प्रश्न, जखमा विरघळून नाहीशा होतात त्या क्षणांत… गारूड करणारं वलयांकित नृत्य… नुसतं नृत्य नसतेच… नुसती आराधना नसते… अवघ्या अनंत निसर्गाला भेटणं असतं… स्वतःच्या आत्म्याबरोबर दुसऱयाही जिवाला भेटणं असतं ते… कोण कुठले जीव? पण त्या जादूभऱया क्षणांसाठी ते एकमेकांबरोबर देहभान हरपून नृत्य करतात.

एक बंजारन झुळणा झुलती हथी
माये अंबेमांना झुळणा झुलती हथी
माये मातेसमाणा नीर मारी माँ
एक बंजारन झुलणा झुलती हथी…’

झोका वाढत जातो. दांडियाचे दणदणाट, घुंगरूंचे छनछनाट्. ताल, गाणी, ठेका, पदन्यास, पटपट, फुललेले चेहरे, हसणारे चेहरे, नाचणारे पाय, गरगर गिरक्या… घोळदार झालरींचे गोंडे लावलेले लेहेंगे, चमकणारे दागिने, आरशांवर चंद्र चमकतो, डोळय़ांमध्ये चांदणं हसतं… एक झपूर्झा मनात, देहात सुरू होतो… ताल वाढतो, गिरक्या वाढतात, घुंगरू, गोंडे, झुमके, पायच नाही सारच नाचतं. पावलाखालची वसुधा, हवेच्या लहरेदार झुळुका… स्वर… प्रकाशाबरोबरचा सावळा अंधार… पणत्या, दिवे… आसमंत… पृथ्वी… न् अवकाशातला चंद्र, चांदण्या या तर रोजच खेळतात गरबा! आजही त्या खेळतात अजून जोमात, आवेशानं…

सारी दुःखे, प्रश्न, जखमा विरघळून नाहीशा होतात त्या क्षणांत… गारूड करणारं वलयांकित नृत्य… नुसतं नृत्य नसतेच… नुसती आराधना नसते… अवघ्या अनंत निसर्गाला भेटणं असतं… स्वतःच्या आत्म्याबरोबर दुसऱयाही जिवाला भेटणं असतं ते… कोण कुठले जीव? पण त्या जादूभऱया क्षणांसाठी ते एकमेकांबरोबर देहभान हरपून नृत्य करतात. तो मोहमयी कालत्रयी क्षण… नृत्य ही सर्वात मूलभूत आदिम गोष्ट… निसर्गानं दान केलेली… पाहा.

पक्षी नृत्य करतात मादीसाठी… मोर पिसारा फुलवतो, नाचतो.. वाराही नाचतो पावसासंगं… ताऱयांची गती पाहा… वलयदार… निश्चित… नेमके हे तारानृत्यच!

सगळं जग एका तालात जगतंय… अवकाश तालात हलतंय… सगळी बंधने… जटिल तटातट तुटतात… तू कोण? मी कोण? नाही… आपण एक सजीव… उन्मुक्त… नाचणारे… गाणारे… आनंदी होत सहजीवन निसर्गाच्या मूलभूत सगुण जगत व्यक्त होणारे सजीव!

आजवर कडीकुलुपात, परंपरेत बंद असणाऱया… घुंघट घेऊन मान मोडून झाडलोट, उष्टीखरकटी काढत राबणाऱया बायका, चूल फुंकत घरसंसार एकटी सांभाळत नवऱयाचे चोचले, नणंदाचे नखरे, सासऱयाचा धाक, सासूचे टोमणे, मुलांचे सर्वच सांभाळणाऱया बायका… याच दिवसांत देवीला पुजताना त्या ते दिवस जगून घेतात. त्यानंतर परत ताणतणाव, कष्ट सर्व विसरून जायचे हेच दिवस.
वयात आलेल्या अन् तरुणींचेही हेच दिवस हसरा चेहरा… एखादा दाद देणारा… दांडिया खेळताना आवडलेला… आयुष्याचा जोडीदार किंवा एखादा उमदा मित्र मिळायचे हेच दिवस.

घर न् भोवताल सुंदर होऊन जातात. उत्सवाचं उत्साहाचं वातावरण… लगबगीनं सजून जाणारा दिवस… इतके दिवस कष्ट करणारे हात चेहरा चमकू लागतो… घरातले लोकही उदार होतात या दिवसांत… आनंद मिळावा न् पुण्यही या एकाच कारणासाठी पैसे कारणी लागतात साठवलेले.
घर आनंदी होतं. घराचाही मेकअप होतो. दिवे लावून तोरणं लेवून ते पण छान दिसू लागतं. गृहलक्ष्मीगत चार दागिने बाहेर पडतात आणि मग घुमू लागते घागर… पदन्यास… लोकगीत… बंद पडलेले स्वर गुंफू लागतात गीतं – लकेरी… छन् छन् नाद सुरू होतो. मग सुरू होतो आनंदमयी नादब्रह्माचा नृत्य आरासाचा सोहळा!

सर्वात पहिलं नृत्य होतं नटराजाचं तांडवनृत्य! नटराज हा नृत्याचा देवता मानला जातो. पण… त्याची आख्यायिका मात्र दुःखदायक आहे. जेव्हा दक्षानं आरंभ केलेल्या यज्ञामध्ये त्याने मुलगी उमा-पार्वती तिला बोलावलं नव्हतंच मग जावई कोण? पण तरीही माहेरघरचं कार्य म्हणून पार्वती गेली. पण तिथंही तिला दुर्लक्षित करून तिचा अपमान केला गेला. हे सहन न होऊन आणि पतीचाही अपमान जिव्हारी लागून तिथंच त्याच यज्ञात अग्निप्रवेश करून तिने प्राणार्पण केलं.

सती पार्वतीनं अग्निप्रवेश केला हे ऐकून शंकरानं प्रचंड संतप्त होऊन तिसरा डोळा उघडला. तिन्ही लोक कापू लागले… ज्वाळा… भूकंप… सर्वत्र त्राहिमाम!

शंकरानं जटा आपटली. त्यातून त्यानं वीरशैव निर्माण करून दक्षाचा समूळ नाश करायला पाठवला. त्यानंतर त्यानं तांडवनृत्य करायला सुरुवात केली आणि तिन्ही लोकांत प्रलय माजला. सर्व भयभीत होऊन विष्णूला शरण गेले. शेवटी विष्णूंनी लहान बालकाचं रूप धारण करून ते शंकराच्या तांडवनृत्य करणाऱया पायाजवळ गेले. शंकराचा तांडवनृत्य करणारा मृत्युदायी पाय बालकावर पडून त्याचा मृत्यू होऊ नये म्हणून तक्षणी शंकरानं तांडवनृत्य थांबवले.

हा आहे नृत्याचा आध्यात्मिक, पौराणिक इतिहास. पण आधी म्हटल्याप्रमाणे नृत्य हे सर्व सजीवांचं पुनरुज्जीवनाचा मूलभूत गोष्टीप्रमाणे त्यांचं हे उपजतच स्वभावधर्म आहे. जेणेकरून पशुपक्षी हे मादीला आकृष्ट करून पुनरुज्जीवन करण्यास संमोहित करतील व तसेच मानवजातही तणाव, दुःख याला सामोरी जाण्यासाठी तणावमुक्तरहित जीवन काही काळ तरी घालवेल.

यासाठी नृत्य, गायन आदी कला यासाठी निसर्गानेच आपल्याला बहाल केल्यात. तेव्हा निसर्गाशी तादात्म्य पावा! नाचा… आनंदे… जगा… आनंदे!

– [email protected]