
आपल्या देशात ‘5 जी’ आले हे उत्तम, पण ‘5 जी’पेक्षा देशाच्या राजकारणाचे ‘हांजी हांजी’ नेटवर्क गतिमान झाल्याचे दुष्परिणाम आपला देश भोगत आहे. आम्ही ‘5 जी’चे स्वागत करतो. इंटरनेटचा वेग वाढवून ‘हांजी हांजी’चा वेग कमी केला तर 2029 पर्यंत देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था नक्कीच बनेल. ‘5 जी’चे पंख या स्वप्नास बळ देतील.
देशात ‘5 जी’ सेवा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते तीन दिवसांपूर्वी सुरू झाली. देशाच्या संपर्क क्षेत्रात क्रांतिकारी ठरणारी ही सेवा आहे. कोटय़वधी देशवासीयांना या वेगवान नेटवर्कची प्रतीक्षा होती. डिजिटल भारताचे स्वप्न राजीव गांधींच्या काळात सुरू झाले. अटलबिहारी यांच्या काळात तेव्हाचे दूरसंचार मंत्री प्रमोद महाजन यांनी ते गतिमान केले व आता मोदी युगात ‘5 जी’ सेवेने ही गती रॉकेटच्या वेगाने पुढे जाताना दिसत आहे. दिल्लीच्या प्रगती मैदानावर ‘5 जी’ प्रणाली वापरून पंतप्रधानांनी परदेशात गाडी चालवली. 5 जी ही स्वदेशी यंत्रणा आहे. या नव्या स्वदेशी यंत्रणेमुळे नव्या युगाची पहाट झाली आहे. 130 कोटी भारतीयांना ‘5 जी’च्या रूपात एक सुंदर भेटवस्तू मिळाली आहे असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. याआधी 2 जी, 3 जी आणि 4 जी प्रणालींसाठी आपल्याला अन्य देशांवर अवलंबून राहावे लागत होते. महाराष्ट्रात मुंबई आणि पुणे या दोन शहरांत सध्या ‘5 जी’ सेवा उपलब्ध होईल. या काळात महाराष्ट्रातील गंमत अशी की, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व मिंधे गटाचे मुख्य नेते हे पनवेल येथील शाळेत खास उपस्थित राहून ‘5 जी’च्या शुभारंभ कार्यक्रमात सहभागी झाले. पनवेलमधील शाळेत मुख्यमंत्री विद्यार्थी बनले. ते विद्यार्थ्यांबरोबर बाकावर बसले. त्यांनी म्हणे विद्यार्थ्यांना ‘5 जी’चे महत्त्व समजावून सांगितले. ‘5 जी’मुळे इंटरनेटला मिळणाऱ्या वेगाचा फायदा अभ्यासासाठी करा, गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असे मार्गदर्शन मुख्यमंत्र्यांनी केले व ते योग्यच आहे. ‘5 जी’मुळे इंटरनेटचा, डिजिटल व्यवहारांचा वेग वाढणार आहे. कॉल ड्रॉप होणे थांबेल. व्हिडीओ, सिनेमे लगेच डाऊनलोड होतील असे अनेक फायदे सांगितले गेले. सध्याच्या बुलेट ट्रेन गतीच्या युगात ते आवश्यक आहेत. त्यातील मुख्य फायदा असा की, ‘5 जी’मुळे देशात रोजगाराच्या संधी वाढणार आहेत. देशातील खरी समस्या महागाई आणि रोजगाराचीच आहे. डिजिटल भारताचे पुढचे पाऊल
बेरोजगारीच्या छाताडावर
पडले तर आनंदच आहे. मोदी यांना वेगाचे वेड आहे. ते देशाला गतिमान करू इच्छितात. त्यांनी जपानच्या मदतीने मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मनावर घेतले व आसपासच्या भागातील जमिनी या प्रकल्पासाठी ताब्यात घेतल्या. म्हणजे या विकासात शेतकरी व जमीनमालकांचेही योगदान आहे हे लक्षात घेतले पाहिजे. देशात सुरू झालेली ‘5 जी’ सेवा विकासात भर घालणारीच आहे, मात्र गेल्या पाच-सहा वर्षांत देशाच्या राजकारणाचे ‘हांजी हांजी’करण ‘5 जी’च्या वेगाने आधीच सुरू झाले व ते पंतप्रधान मोदी यांच्या प्रतिमेस तडा देणारे आहे. घराणेशाही, वंशवादाच्या राजकारणात ‘हांजी हांजी’ चालते, पण लोकशाहीत ‘5 जी’वर ‘हांजी’ने मात करू नये इतकीच अपेक्षा असते. मोदी यांनी देशात ‘5 जी’ युग सुरू केले, पण देशाच्या अनेक भागांत आज इस्पितळे नाहीत. शिक्षणाची बोंब आहे. महाराष्ट्रात, मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्हय़ात आदिवासींना ‘झोळी’ व ‘डोली’च्या माध्यमांतून आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचवावे लागते. गरोदर स्त्र्ाया त्या झोळीतच अनेकदा बाळंत होतात व त्यात अर्भकांचे मृत्यू होतात. ‘5 जी’ युगातील हे चित्र विदारक आहे. गरीबांना फुकट धान्य दिले जाते, पण हे काही स्वावलंबी भारताचे चित्र नाही. पंतप्रधान मोदी यांची स्वप्ने उत्तुंग आहेत व त्यांना लोककल्याणकारी पद्धतीने राज्य करायचे आहे. कल्याणकारी राज्याचे मार्मिक वर्णन डॉ. कॉलिन क्लार्क यांनी केले आहे. ते म्हणतात की, ‘एखाद्याने सणाच्या दिवशी लोकांवर भेटवस्तूंचा वर्षाव करावा आणि नंतर काही दिवसांनी त्या भेटवस्तूंची सगळी किंमत आपल्या भरपूर कमिशनसहित संबंधितांकडून वसूल करावी, असे कल्याणकारी राज्याचे स्वरूप असते.’ आपल्या देशात नेमके हेच चित्र दिसत आहे. चार दिवसांपूर्वी मुंबईच्या वर्तमानपत्रात एक बातमी आली. मुंबईतील एका हॉटेलात ‘मॉडेल’ तरुणीने आत्महत्या केली. आत्महत्येच्या चिठ्ठीत ती तरुणी लिहिते, ‘गेले काही दिवस शांत झोप लागत नसल्याने मी आत्महत्या करीत आहे!’ देशात
अशा आत्महत्या
आता रोजच होत आहेत. ‘5 जी’मुळे अशा निराश लोकांचे मन स्थिर व्हावे व त्यांना शांत झोप लागावी. देशाच्या अर्थचक्राला गती मिळाल्याशिवाय ते शक्य नाही. सत्य असे आहे की, ऑगस्ट महिन्यापासून देशाच्या ‘आयाती’मध्ये वाढ आणि निर्यातीमध्ये घट झाल्यामुळे महसुली तूट वाढली आहे. देशाची महसुली तूट ही विक्रमी अशा 125.2 अब्ज अमेरिकी डॉलरवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या वर्षी एप्रिल ते ऑगस्ट या काळात महसुली तूट 53.8 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी होती. महसुली तूट अशीच सुरू राहिली तर चालू आर्थिक वर्षाखेरीस ही तूट 250 अब्ज अमेरिकी डॉलरपर्यंत पोहोचेल. आताच आपला रुपया डॉलरच्या तुलनेत 82 रुपयांपर्यंत लुडकला आहे. ‘5 जी’ डिजिटल क्रांतीची पहाट होत असतानाचे हे चित्र काय सांगते? देशाची अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे ढोल बडवणाऱ्या मोदी सरकारचे अर्थकारण पुरते बिघडले आहे. मार्च 2022 अखेर देशाच्या डोक्यावर असलेले परकीय कर्ज तब्बल 620 अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. देशाच्या अर्थमंत्र्यांनी यावर बोलायला हवे. पण त्या बोलणार नाहीत. निदान अर्थतज्ञ म्हणवून घेणाऱ्यांनी तरी सत्य समोर आणावे. श्रीलंका, ग्रीस, मालदिव यांसारखी लहान राष्ट्रे परकीय कर्जात व आंतरराष्ट्रीय सावकारी पाशात फसली आहेत. हिंदुस्थान हा मोठा देश आहे. पण शेवटी कर्ज वाढले की त्याचा फटका सामान्य जनतेला बसेल. राज्यकर्त्यांचे व उद्योगपतींचे काय जाते? देशाचे वातावरण बिघडले आहे. उद्योग, व्यापार करणाऱ्यांसाठी वातावरण बरे नाही. आपल्या देशात ‘5 जी’ आले हे उत्तम, पण ‘5 जी’पेक्षा देशाच्या राजकारणाचे ‘हांजी हांजी’ नेटवर्क गतिमान झाल्याचे दुष्परिणाम आपला देश भोगत आहे. आम्ही ‘5 जी’चे स्वागत करतो. इंटरनेटचा वेग वाढवून ‘हांजी हांजी’चा वेग कमी केला तर 2029 पर्यंत देश जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था नक्कीच बनेल. ‘5 जी’चे पंख या स्वप्नास बळ देतील.

























































