
नगर जिल्ह्यातील रस्त्यांची दुरावस्था झाली असतानाच नगर-कोपरगाव महामार्गाचे पुन्हा नव्याने निविदा काढल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. पूर्वीच्या निविदेपेक्षा त्यात दुपटीचा फरक झाल्यामुळे न झालेल्या कामाबद्दल कोण जबाबदार आहे, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेला आहे. त्यामुळे नगर-मनमाड महामार्ग आता थेट जानेवारीनंतरच सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी नगर-कोपरगाव महामार्गाच्या रस्त्यांच्या संदर्भात काल मोठा उलगडा केला. पूर्वीच्या साडेचारशे कोटी रुपयांच्या रस्त्याचे काम हे ज्या ठेकेदाराला देण्यात आले होते. त्या ठेकेदाराने स्वतः न करता त्यांनी दुसरा उपठेकेदार नेमून त्याच्याकडे हे काम दिले होते. प्रत्यक्षात नगर-कोपरगाव महामार्गाची रस्त्याची कामे हाती घेण्यात आली. काही ठिकाणी खोदकामही करण्यात आले, तर अनेक ठिकाणी एक बाजूचा रस्ता बंद करून वाहतूक व्यवस्थासुद्धा सुरू करण्यात आलेली होती.
गेल्या वर्षभरापासून अतिशय संथ गतीने काम सुरू झाले. यामध्ये राजकीय घडामोडी घडल्यानंतर संबंधित ठेकेदाराने काम बंद करून तो निघूनही गेला. या संदर्भामध्ये खासदार सुजय विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जेव्हा नगर जिल्ह्यामध्ये आले होते त्यावेळी त्यांच्या कानावर हा प्रकार घालून या प्रकरणात लक्ष घालावे, असे त्यांनी सुचवले होते. वास्तविक पाहता या रस्त्याच्या संदर्भात गेल्या वर्षभरापासून खेळखंडोबा पाहायला मिळत आहे. रस्त्याचे काम झालेच नाही, याउलट संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. आता तर हा रस्ता फक्त खड्डे बुजवण्यासाठीच राहील, असे सांगण्यात आलेले आहे.
नगर-कोपरगाव महामार्गाची दुरावस्था पाहता येथील वाढती रहदारी आणि साधारणत: 4000 वाहनांची दररोज या ठिकाणी ये-जा असते. सुरत-गुजरात-हैदराबाद यांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे. येथून शनिशिंगणापूर येथे लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात, मात्र अजून या रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. समृद्धी महामार्गसुद्धा याच जिल्ह्यातून जात असल्यामुळे आता नगर-कोपरगाव रस्तासुद्धा यामध्ये टाकावा, असा निर्णय घेण्यात आला. त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. 450 कोटी रुपयांच्या पहिल्या प्रस्तावाची निविदा 900 कोटी आहे. याची मुदत जानेवारीपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. जानेवारीला निविदा उघडल्यानंतर प्रत्यक्षात कोणी काम घेतले व कोणी कोणी निविदा भरल्या हे निश्चित झाल्यावर खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात होणार आहे. तात्पुरता रस्ता व यातील खड्डे पाहता हे बुजवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. पूर्वीपेक्षा दुपटीने टेंडर वाढल्याने पहिल्या ठेकेदाराने का काम केले नाही, याला जबाबदार कोण आहे हा खरा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मोठ्या प्रमाणामध्ये जर निधी लागणार असेल, तर याचा विचार अगोदर का केला गेला नाही, असाही प्रश्न निर्माण झालेला आहे.



























































