
देशात लवकरच लागू होणारा कामगार कायदा संघटित आणि असंघटित कामगारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. या कायद्यानुसार कर्मचाऱ्यांकडून आठवडाभरात 48 तासांहून अधिक तास काम करून घेतले जाऊ शकत नाही. पंपनी व्यवस्थापनाच्या सहमतीने कर्मचारी आठवडय़ाचे काम चार दिवसांतही पूर्ण करून इतर दिवशी सुट्टीचा आनंद घेऊ शकतात. कामगार मंत्रालयानुसार देशातील 31 हून अधिक राज्यांनी हा कामगार कायदा स्वीकारला असून लवकरच या कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी होणार आहे.
कामगार कायदा लागू झाल्यानंतर एक वर्ष काम केले तरी कर्मचाऱ्याला ग्रॅच्युईटीचा हक्क मिळणार आहे. सध्याच्या घडीला त्यासाठी किमान पाच वर्षे नोकरीची गरज आहे. तसेच ठरलेल्या वेळेपेक्षा कर्मचाऱ्याने 15 मिनिटेही जास्त काम केल्यास त्याला ओव्हरटाईम लागू होणार आहे. नव्या कर्मचाऱ्यांना दीर्घ सुट्टीसाठी आता जास्त वाट पाहण्याची गरज नाही. 180 दिवस काम केल्यानंतर कर्मचारी दीर्घ सुट्टी घेऊ शकतो. सध्या या सुट्टीसाठी 240 दिवसांपर्यंत काम करणे आवश्यक आहे.
मूळ वेतन सीटीसीपेक्षा 50 टक्के जास्त हवे
कर्मचाऱ्याचे मूळ वेतन दरमहाच्या सीटीसीपेक्षा (कॉस्ट टू पंपनी) 50 टक्के वा जास्त असेल. नव्या कायद्यावर इंडियन फेडरेशन ऑफ ट्रेड इंडियन्सने म्हणणे मांडले असून सध्या कंपनीतील 20 कर्मचाऱ्यांना संरक्षण मिळत होते. आता ही संख्या 50 करण्यात आली आहे. त्यामुळे या नव्या कायद्यामुळे कामगारांचा मोठा वर्ग कायद्याच्या कक्षेतून बाहेर जाणार असल्याचे फेडरेशनने सांगितले.
कर्मचाऱ्यांना संपाचा अधिकार नाही
कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात एखाद्या मुद्दय़ावरील वाटाघाटी अयशस्वी झाल्यास सदर माहिती सरकारला देण्यात येईल. नंतर हे प्रकरण लवादाकडे जाईल. लवादाकडून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना संपाचा अधिकार असणार नाही. कर्मचाऱ्यांची सामूहिक सुट्टीदेखील संपाच्या श्रेणीत ठेवण्यात येईल. काही राज्यांनी या कायद्यातील तरतुदींवर आक्षेप घेतला आहे. त्यावर चर्चा सुरू असल्याचे कामगार मंत्रालयाने स्पष्ट केले.
देशातील कामगारांची संख्या (टक्के)
कृषी उद्योग 41.19
सेवा क्षेत्र 32.33
उद्योग क्षेत्र 26.18
(देशातील कामगारांची एकूण संख्या 50.1 कोटी)




























































