
खड्डय़ांमुळे अक्षरशः चाळण झालेल्या नगर-मनमाड महामार्गाच्या दुरवस्थेचे वृत्त दैनिक ‘सामना’तून प्रसिद्ध होताच प्रशासनाला खडबडून जाग आली असून, या महामार्गाच्या दुरुस्तीची प्रक्रिया अखेर सुरू झाली आहे. महामार्गाच्या दुरुस्तीसाठी 15 ते 30 ऑक्टोबरपर्यंत नगर शहरातील विळद बायपास चौक ते कोपरगाव शहरातील पुणतांबा फाटा या रस्त्यावरून जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येणार आहे. याबाबतचे परिपत्रक पोलीस अधीक्षक कार्यालयातील वाहतूक शाखेकडून जारी करण्यात आले आहे.
नगर-मनमाड महामार्ग खड्डय़ांच्या बाबतीत कायमच चर्चेत असतो. पाऊस आणि समृद्धी महामार्गाच्या कामामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. शिर्डी आणि शनिशिंगणापूर ही आंतरराष्ट्रीय दर्जाची देवस्थाने याच मार्गावर आहेत. रोज हजारोंनी वाहने या रस्त्यावरून धावत असतात. तसेच अवजड वाहतूकही मोठय़ा प्रमाणावर सुरू असते. मात्र, या महामार्गावरील खड्डय़ांमुळे वाहनचालक जेरीस आले होते. लहानमोठे अपघात रोजच घडत असतात. शिवाय वाहतुकीचा वेग मंदावत असल्याने रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.
याबाबत दैनिक ‘सामना’तून नुकतेच वृत्त प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर कोपरगावातील ऍड. नितीन पोळ यांनी थेट रस्त्यावरील खड्डय़ात बसूनच केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांना रस्त्याच्या दुरवस्थेवरून पत्र लिहिले. त्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आली असून, या मार्गाच्या दुरुस्तीसाठी 15 ऑक्टोबर ते 30 ऑक्टोबरपर्यंत या मार्गावरील अवजड वाहतूक वळविण्यात येणार आहे. याबाबत 14 ऑक्टोबरपर्यंत हरकती दाखल करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
नगर-पुणे-सोलापूरकडून मनमाडकडे जाणाऱया सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना विळद बायपास चौक येथून मनमाडकडे जाण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, त्यांनी कल्याण बायपास चौक नगर-कल्याण मार्गावरून आळेफाटा संगमनेरमार्गे नाशिककडे किंवा विळद घाट दूध डेअरी चौक शेंडी बायपासमार्गे नगर-संभाजीनगर महामार्गावरून कायगाव, गंगापूर, वैजापूर, येवल्याकडे जावे.
शनिशिंगणापूर-सोनई रस्त्यावरून मनमाड-राहुरीकडे येणाऱया अवजड वाहतुकीला राहुरीकडे येण्यास प्रतिबंध करण्यात आला असून, या मार्गावरील वाहने नगर-संभाजीनगर महामार्गावरून इच्छितस्थळी जातील. मनमाड-येवला- शिर्डीकडून नगरमार्गे पुणे, मुंबई, कल्याणकडे जाणारी अवजड वाहने पुणतांबा फाटा येथून चांदेकसारे-संगमनेर-आळेफाटा मार्गे जाता येईल. मनमाड-येवल्याकडून नगर, सोलापूर, बीडकडे येणारी अवजड वाहने पुणतांबा फाटा येथून वैजापूर, गंगापूर, कायगाव, प्रवरासंगम, शेंडी बायपास, विळद घाट केडगाव बायपासमार्गे जातील. लोणी, बाभळेश्वर, श्रीरामपूरकडून नगरकडे येणारी अवजड वाहने बाभळेश्वर, श्रीरामपूर, टाकळीभान, नेवासा मार्गे नगरकडे जातील, असे आदेश पोलीस अधीक्षकांनी काढले आहेत.



























































