
या वर्षी दिवाळीत 25 ऑक्टोबर रोजी खंडग्रास सूर्यग्रहण दिसणार असून ते हिंदुस्थानसह आशिया खंडाचा पश्चिम व मध्य भाग, संपूर्ण युरोप, आफ्रिका खंडातून दिसणार आहे. एकीकडे पृथ्वीवर दीपोत्सवाचा झगमगाट असताना आकाशातही सूर्यग्रहणाची सुंदर रोषणाई पहायला मिळणार आहे.
याविषयी अधिक माहिती देताना पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण म्हणाले की, आश्विन अमावास्या मंगळवार 25 ऑक्टोबर रोजी आहे. या दिवशी खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे. मुंबईतून पाहिल्यास सायंकाळी 4.49 वाजता सूर्यग्रहणास प्रारंभ होईल. ग्रहण मध्य सायंकाळी 5.43 वाजता होईल. त्या वेळी चंद्रबिंब सूर्यबिंबाचा 36 टक्के भाग झाकून टाकील. पश्चिम आकाशात हे सुंदर दृश्य पाहता येईल. नंतर ग्रहण सुटण्याआधीच सायंकाळी 6-08 वाजता सूर्यास्त होईल. ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. महाराष्ट्रातील पश्चिमेस सागरात ग्रहणातच सूर्यास्त होताना दिसेल. छायाचित्रकारांना ही एक पर्वणीच असेल.
देशभरात वेगवेगळ्या ठिकाणांहून वेगवेगळ्या वेळी हे सूर्यग्रहण दिसेल.
– या सूर्यग्रहणानंतर 14 दिवसांनी मंगळवारी 8 नोव्हेंबर रोजी होणारे चंद्रग्रहणही हिंदुस्थानातून दिसणार आहे. त्या दिवशी ग्रहणातच चंद्र उगवताना दिसणार आहे.






















































