
हर्णे येथील गोवा किल्ल्याला संरक्षक असलेली काळ्या पाषाणाची तटबंदी ढासळत चालली आहे. त्यामुळे इतिहासाचा साक्षीदार असलेला गोवा किल्ला हा संवर्धनाच्या प्रतिक्षेत आहे. मात्र तरीसुध्दा पुरातत्व विभाग हे किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करत नाही. गोवा किल्ल्याची देखभाल दुरूस्ती अखत्यारीत असलेले पुरातत्व विभाग हे किल्ल्याच्या संवर्धनाचे काम करणार की किल्ल्याचे नामोनिशाण मिटल्यावरच पुरात्व विभाग जागे होणार असल्याचा संतप्त सवाल येथे आलेले दुर्गप्रेमी, पर्यटक, इतिहास अभ्यासकांकडून विचारला जात आहे.
दापोली तालूक्यात हर्णे येथे समुद्राच्या काठावर गोवा नावाचा एक किल्ला आहे. या किल्ल्यात असलेल्या ऐतिहासिक खुणा या आधीच भग्नावस्थेत गेलेल्या असताना दुसरीकडे आता किल्ल्याला संरक्षक असलेली काळया पाषाणाची तटबंदी सुध्दा ढासळत चालली आहे. त्यामुळे इतिहासाच्या वैभवशाली पराक्रमाच्या नष्ट होत चालेल्या या ऐतिहासीक ठेव्याचे जतन व्हायला हवे असे येथे आलेल्यांकडून बोलले जात असले तरी पुरात्व विभागाकडून मात्र काहीच हालचाली होताना दिसत नाहीत.
हर्णे येथील गोवा किल्ल्याचा इतिहास पाहता इ.स.1754 मध्ये आंग्य्रांच्या आरमाराने गोवा गडाजवळ डचांच्या 3 जहाजांवर हल्ला केला. त्यात डचांची 2 जहाजे जळाली व तिसरे पूर्ण मोडकलीस आले. या प्रसंगात आंग्य्रांची काही जहाजे जळालेली माहीती सांगितली जाते. 3 एप्रिल 1755 रोजी हा गोवा गड तुळाजी आंग्य्रांच्या ताब्यात होता. 16 एप्रिल 1755 दरम्यान रामाजी महादेव यांनी आंग्य्रांचे जे 7 किल्ले घेतले त्यात गोवा गडही होता. इ.स. 1755 मध्ये पेषव्यांचा इंग्रजांशी तह झाला. त्या तहा नुसार गोवा गड इंग्रजांनी कमांडर जेम्सच्या नेतृत्वाखाली जिंकून पेशव्यांच्या ताब्यात दिला. या गोवा गडालाच हर्णेचा किल्ला असे देखील म्हटले जाते. इ.स. 1818 मध्ये कर्नन केनेडीने हा गोवा गड इंग्रजांसाठी जिंकून घेतला. पुढे इ.स. 1862 मध्ये गोवा गडाची पाहणी करण्यात आली. तेव्हा 19 शिपाई गोवा गडाची देखभाल करत होते. त्या पाहणीत गडावर 69 तोफा असल्याचे आढळून आले. हा किल्ला सुवर्णदुर्गच्या संरक्षणसाठी शिवकाळात बांधला गेला असण्याची जास्त शक्यता वाटते. किल्ल्यावरील अवशेषांवरून आंग्रे, पेशवे व इंग्रज यांच्या काळात देखील किल्ल्यात वेळोवेळी दुरूस्ती झाली असावी असे अवशेषावरून दिसते.
गोवा गडाचा कमान असलेला पूर्वेचा दरवाजा लागतो या दरवाजाला देवड्या नाहीत. या दरवाजातून आपण आत आल्यावर आपल्याला डाव्या टेकडीवर दक्षिणेकडे असलेला बालेकिल्ला दिसतो. गोवा गडाच्या उत्तरेला व पश्चिमेला समुद्र आहे. उत्तम बांधणीतील उत्तराभिमुख दरवाजाला देवडया आहेत. येथे मेघडंबरीसदृश्य बांधकाम दिसते. या दरवाजाच्या दो न्ही बाजूला असणा-या चौथ-याच्या तळाशी व्याघ्रसदृश्य प्राण्याचे शिल्प कोरलेले दिसते. त्यातील डाव्या बाजूला गंडभेरूडांने चार हत्ती पकडल्याचे शिल्प आहे. तर उजवीकडील शिल्प शरभाचे आहे. ही दोन्ही वैशिष्टयपूर्ण शिल्पे आहेत. या किल्ल्याच्या मागच्या पश्चिम बाजूला जायचे येथून सुर्वण दुर्गाचे अप्रितम दर्शन होते. या दरवाज्या समोर दगडांचा एक भला मोठा ढिगारा पडलेला दिसतो या दरवाजाच्या उजवीकडे तटाजवळ मारूतीचे छोटेखानी मंदिर आहे. दोन एकरातील या किल्ल्यात असलेली बांधकामे जमिनदोस्त झाल्याने आता फक्त चौथरे दिसून येतात. तर मध्यभागी चुनेगच्ची बांधकामाची एक छोटे वास्तू लागते. शेजारी युरोपीयन बांधकामाच्या दोन ईमारती आहेत. यापैकी एक ब्रिटीश कलेक्टरसाठी तर दुसरी ईतर इंग्रजांसाठी होती. मात्र आज त्या इमारती भग्नावस्थेत पडलेल्या आहेत. या वास्तू शेजारी बारमाही गोडया पाण्याचा काळया पाषाणातील मोठा बांधीव तलाव आहे. पण त्याचे पाणी पिण्यास योग्य नाही.
‘गोवा किल्ला हा संरक्षित स्मारक असला तरी रेग्यूलर बजेटमध्ये त्याच्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध नाही. तथापी अशा किल्ल्यांना जर बजेटच्या बाहेर वेगळा निधी उपलब्ध झाल्यास बाणकोट किल्ल्यासारख याही किल्ल्याचे सुशोभिकरण आणि दुरूस्ती होवून पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होईल आणि स्थानिकांना रोजगार मिळेल.’
डाॅ. विलास वहाने, सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, रत्नागिरी





























































