
राज्यात रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि प्रवासी त्रस्त आहेत. रस्त्यातील खड्ड्यांची समस्या चांद्यापासून बांद्यांपर्यंत आहे. मात्र, चंद्रपूर जिल्ह्यात असा एक मार्ग आहे, ज्या मार्गावरून प्रवास करताना थरार अनुभवायला मिळतो. कधी झोक्यावर असल्यासारखे वाटते. तर कधी सिटवरून उडून पुन्हा खाली येतो. चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा कोरपना ते वणी राज्य महामार्ग गेल्या एक दशकापासून उपेक्षित आहे. या मार्गाने एसटीतून प्रवास करणारे प्रवासी थरार अनुभवत आहेत. या समस्येकडे लोकप्रतिनीधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी समाजमाध्यमात याबाबतचे मिम्स वायरल होत आहेत.
चंद्रपूर-यवतमाळ जिल्ह्याला जोडणारा कोरपना ते वणी राज्य महामार्ग गेल्या एक दशकापासून उपेक्षित आहे. मार्गाची अवस्था अत्यंत बिकट आहे. मार्गात हजारो खड्डे आहेत. त्यामुळे जीवघेण्या खड्ड्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागते. राजुरा आगाराने मार्गाची अवस्था बघता या मार्गावरील बस फेऱ्या बंद केल्या होत्या. आता परत बसफेरी सूरू झाली आहे. एसटीने प्रवास करतानाचा एक व्हिडीओ वायरल झाला आहे. झूला झूलायचा असेल तर या मार्गाने या, असा उपहासात्मक टोला मिम्सचा माध्यमातून मारला गेला आहे. हा व्हिडीओ तुफान वायरल होत आहे.




























































