
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे यांचा मृतदेह सापडला आहे. घोरपडे हे बेपत्ता झाले होते आणि त्यांनी सारोळा (ता.भोर) येथील निरा नदीमध्ये उडी मारल्याचा संशय व्यक्त करण्यात येत होता. सातारा जिल्ह्यातील शिरवळ पोलीस स्टेशनमध्ये शशिकांत घोरपडे हे बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होते. निरा नदीपात्रामध्ये युद्धपातळीवर त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
महाराष्ट्र राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत पतंगराव घोरपडे (वय 48 वर्षे) हे बुधवारी (12 ऑक्टोबर) दुपारपासून बेपत्ता होते. त्यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन भोर तालुक्यातील सारोळा हद्दीतील नीरा नदी पुलावर आढळून आले होते आणि त्यांच्याकडील वाहनही तेथेच मिळाल्याने कुटुंबीयांनी शिरवळ पोलीस ठाण्यात याबाबतची तक्रार दिली होती.
शशिकांत घोरपडे हे 12 तारखेला दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या पुणे येथील कार्यालयातून बाहेर पडले होते. तेथून ते साताऱ्याला जाण्यासाठी निघाले होते, मात्र रात्री ते घरी न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना शोध सुरू केला होता. त्यांच्या मोबाईलचे लोकेशन हे सारोळा नीरा नदीपुलावरचे मिळाले. तसेच, घोरपडे यांच्याकडे असलेली त्यांच्या मित्राची कार ही पुलाजवळील हॉटेलसमोर आढळून आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये नीरा नदीपात्रालगतच्या एका हॉटेलपासून एक व्यक्ती चालत पुलाकडे जात त्याने नदीपात्रात उडी मारल्याचे दिसून आले होते. त्यामुळे नदीत उडी मारणीरी व्यक्ती ही घोरपडेच असावेत अशी शंका वर्तवली जात होती. घटनास्थळी महाबळेश्वर ट्रेकर्स, शिरवळ रेस्क्यू टीम, भोर आपत्ती व्यवस्थापनाचे जवान, भोईराज जलआपत्तीचे जवान युद्धपातळीवर शोधकार्य करत होते. एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने घोरपडे यांचा मृतदेह मिळाल्याचे वृत्त दिले आहे.
मूळचे सातारा जिल्ह्यातील रहिवासी असलेले शशिकांत घोरपडे पणन सहसंचालक म्हणून कार्यरत होते. बुधवारी दुपारी तीन – साडेतीनपर्यंत ते पुण्यातील पणन संचालनालयाच्या कार्यालयात उपस्थित होते. त्यानंतर मित्राची कार घेऊन ते पुण्याहून साताऱ्याला यायला निघाले. सातारा व पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या नीरा नदीच्या पुलाजवळील एका हॉटेलच्या दारात कार पार्क करून ते नदीपात्राच्या दिशेला गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले आहे. त्यानंतर त्यांच्याशी कोणाचाही संपर्क होऊ शकला नव्हता.
नीरा पुलापासून पूर्वेला वीर धरण असल्यामुळे या ठिकाणी पाण्याचा फुगवटा आहे. सुमारे 70 फूट खोल पाण्यात त्यांचा शोध घेणे खूपच जिकिरीचे झाले होते. परंतु शोध पथके शर्थीने प्रयत्न करत होती. आज सकाळी 11.55 वाजता घटनास्थळापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर घोरपडे यांचा मृतदेह मिळून आला. घोरपडे यांनी आत्महत्या केली, की त्यांच्या बाबतीत काही विपरीत घडले याबद्दल विविध तर्कवितर्क सुरू आहेत. त्यांच्यावर कोणाचा दबाव होता अथवा त्यांना कोणी ब्लॅकमेल करत होते, ते कोणत्या तणावाखाली होते का ? यादृष्टीने पोलीस तपास करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.






























































