रशियाच्या लष्करावर अंदाधुंद गोळीबार, 11 जणांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रशियाच्या लष्करी प्रशिक्षण मैदानात गोळीबार झाल्याचं वृत्त असून त्यात 11 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. रशियाच्या बेलगोरोड येथे हे प्रशिक्षण केंद्र असून बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण सुरू होतं. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

या दुर्घटनेविषयी रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने माहिती दिली आहे. यूक्रेनविराधातील युद्धात सहभागी होण्याची इच्छा काही रशियन नागरिकांनी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण देण्यासाठी एक विशेष सत्र आयोजित करण्यात आलं होतं. या प्रशिक्षण सत्रावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला, अशी माहिती मंत्रालयाने दिली आहे.

या चकमकीत दोन हल्लेखोरांचा खात्मा करण्यात रशियन सैन्याला यश आलं. या घटनेतील दोन हल्लेखोर हे आधीच्या सोवियत गणराज्याचे नागरिक होते. युक्रेनजवळ असलेल्या लष्करी भागात ही घटना घडल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली आहे.

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाची झळ संपूर्ण जगाला पोहोचत असतानाच रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी गंभीर इशारा दिला आहे. नाटोच्या फौजांची रशियाच्या लष्कराशी चकमक झाल्यास जगभरात विध्वंस होईल, असे पुतीन यांनी म्हटलं आहे.