
खिडकी साफ करणे मुलुंड येथील एका 66 वर्षीय वृद्धेच्या जिवावर बेतले. सफाई करत असताना खिडकीची ग्रील तुटल्याने दुसऱ्या मजल्यावरून खाली पडून सुलोचना सोष्टे यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
मुलुंड पश्चिमेकडील बी. आर. मार्गावरील स्वप्नदीप इमारतीत साधू शेट्टी आणि त्यांच्या वृद्ध पत्नीसोबत राहतात. त्यांच्याकडे सुलोचना या गेल्या दोन वर्षांपासून घरकामाला होत्या. आज सकाळी त्या स्वयंपाकघरातील खिडकीची काच साफ करत असताना ग्रील तुटल्याने सुलोचना ग्रीलसह खाली पडल्या. दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने त्यांचे डोके आणि दोन्ही पायांना गंभीर दुखापत झाली. सुलोचना यांना लगेच अग्रवाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्याआधीच मृत घोषित केले. याप्रकरणी मुलुंड पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करीत आहेत.



























































