
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिंदे गटात काहीजण प्रवेश करत आहेत. राज्यातील या पक्षबदलाच्या घटनेचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला. सध्या विविध मुद्द्यांवरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. विविध मुद्द्यांवर शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधकांकडून जोरदार टीका होत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. आधी भाजप पक्ष होता, आता मात्र भारतीय जनता लॉन्ड्री झाली आहे, असा टोला त्यांनी लगावला आहे.
भाजपला ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढवण्याचे काम केले ते कार्यकर्ते आज कुठे आहेत, अशी विचारणा करत त्यांच्या जागी आता आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये एवढा मान-सन्मान मिळत आहे, हे पाहून बरे वाटले. आमच्याकडे त्यांना काही कमी नव्हते. मात्र बरे झाले त्यांना दोन्हीकडे सन्मान मिळत आहे, असा टोलाही सुळे यांनी लगावला.
भाजप नेत्यांकडे बोलण्यासाठी आता काही उरले नाही, त्यामुळे त्यांची दडपशाही सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. भाजप आधी पक्ष होता आता भारतीय जनता लॉन्ड्री झाली आहे. ज्यांनी भाजपाला वाढवले, संघटना मजूबत केली. अगदी माईक लावण्यापासूनची कामे ज्या कार्यकर्त्यांनी केली, ते कार्यकर्ते आता कुठे आहेत? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी केला आहे.



























































