
बेस्टच्या ताफ्यात समाविष्ट केलेल्या खाजगी बसेसच्या चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ‘काम बंद’ आंदोलन पुकारल्याने प्रवाशांचे ऐन दिवाळीत हाल होत आहेत. शनिवारी सांताक्रुझ बस आगारातील मातेश्वरी कंपनीच्या कंत्राटी चालक, वाहकांनी काम बंद आंदोलन केल्यानंतर रविवारी मजास आगारातील कंत्राटी चालक, वाहकांनी काम बंद आदोलन केले होते. आता सोमवारी तिसऱया दिवशी मरोळ आगारातील कंत्राटी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांना गैरसोयींना सामोरे जावे लागते आहे.
दिवाळी बोनस, पगारवाढ, बेस्टच्या बसमध्ये मोफत प्रवास आदी मागण्यांसाठी कंत्राटी बस चालकांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. गेल्या दीड-दोन वर्षांपासून बेस्टच्या कंत्राटी बस चालक व वाहकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी वारंवार आंदोलन केले आहे. आंदोलनानंतर बेस्ट प्रशासन संबंधित कंत्राटदारावर थातूरमातूर दंड आकारत असते आणि पुन्हा काही दिवसांनी हे कंत्राटी कामगार काम बंदचे आंदोलन छेडून प्रवाशांना वेठीस धरतात. बेस्टच्या वाहकाला 18 हजार 500 रुपये पगार ठरला होता, मात्र प्रत्यक्षात कमी पगार दिला जातो. आठ तासांहून अधिक तास काम करावे लागत असून त्याचा ओव्हर टाइमही मिळत नाही, अशा तक्रारी या कंत्राटी कामगारांनी केल्या आहेत.
सुरुवातीला मातेश्वरी कंपनीच्या कर्मचाऱयांनी आंदोलन केले होते. रविवारी जोगेश्वरीतील मजास आगार, शीव येथील प्रतीक्षा नगर या डेपोंमध्येही कामगारांनी काम बंद आंदोलन केले. या आगारातील कामगारांना बोनसची रक्कम देण्याच्या आश्वासनानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. त्यानंतर सोमवारी तिसऱया दिवशी हंसा प्रा.लि. या कंपनीच्या मरोळ आगारातील कामगारांनी काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनामुळे बेस्ट बस वाहतूक विस्कळीत झाली असल्याने प्रवाशांचे हाल होत असून दरवाढ झाल्याने त्यांना महागडय़ा टॅक्सी व रिक्षातून प्रवास करावा लागत आहे.



























































