
>> प्रशांत गौतम
नांदेड येथील ‘इसाप’ प्रकाशनचे प्रकाशक दत्ता डांगे यांना नुकताच प्रकाशन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी मुंबई मराठी साहित्य संघाचा वि. पु. भागवत पुरस्कार घोषित झाला. ज्याचे वितरण 29 ऑक्टोबर 22 रोजी मुंबईत होणार आहे. 30 वर्षांपूर्वी त्यांनी या प्रकाशन संस्थेची स्थापना केली, पण तत्पूर्वी ते स्थानिक ‘गोदातीर समाचार’ दैनिकात प्रदीर्घ काळ पत्रकार म्हणून कार्यरत होते. पत्रकारितेसोबत बालसाहित्याच्या क्षेत्रातही बालकथा, बालकादंबरी प्रांतात सकस दर्जेदार लेखन करीत असत. पण 1992 पासून त्यांनी पूर्णवेळ प्रकाशन क्षेत्रास वाहून घेण्याचे ठरवले. 30 वर्षांच्या कालावधीत ‘इसाप’ प्रकाशनाने सहाशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली. कथा, कविता, कादंबरी, ललित, बालकथा, बालकादंबरी, बालकवितासंग्रह, बालनाटय़, थोरांची चरित्रे, सुविचार अशी पुस्तके ‘इसाप’ प्रकाशनाकडून प्रकाशित करण्यात आली.
राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेच्या माध्यमातून अनेक लेखकांची पुस्तके प्रकाशित झाली. ‘सर्वांचे सुखी जीवन हेच माझे जीवन’ हे ब्रीदवाक्य घेऊन त्यांनी 30 वर्षांपूर्वी सुरू केलेली वाटचाल आज बहुआयामी झाली आहे. यातील महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ग्रंथ प्रदर्शन व विक्री, माळेगाव यात्रेत ग्रंथ प्रदर्शन, महाराष्ट्र ग्रंथोत्सवाचे आयोजन, महाराष्ट्र ग्रंथ प्रदर्शन, लेखकांचा सुवर्णपदक देऊन गौरव, प्रकाशनाचे साहित्य संमेलन, महाराष्ट्र पीडित कल्याण विभागास ग्रंथभेट, देशभरातील शाळा-शाळांमध्ये लेखन स्पर्धा या उपक्रमांविषयी आवर्जून सांगावे लागेल. यातील ठळक काही मुद्दे अधोरेखित करणे या निमित्ताने अगत्याचे वाटते. ‘इसाप’ने मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, उर्दू भाषेतील हजारो पुस्तके प्रदर्शनात मांडली. अशी 200 प्रदर्शने गावपातळीपासून ते अखिल भारतीय संमेलनातही भरवली. याचे फलित म्हणजे 200 ग्रंथ प्रदर्शनातून सुमारे दहा लाख ग्रंथ प्रतींची विक्री झाली. त्याचप्रमाणे नांदेड येथे वर्षांतून किमान दोनदा ग्रंथ प्रदर्शने आयोजित होतात. जी महिनाभर चालत असतात. त्यात नॅशनल बुक ट्रस्टची महत्त्वाची पुस्तके उपलब्ध असतात. त्याला हजारो वाचक भेट देतात. प्रतिवर्षी 14 नोव्हेंबरला ‘इसाप’ प्रकाशन, राष्ट्रीय पुस्तक प्रकाशन सप्ताह आयोजित करीत असते. नॅशनल बुक ट्रस्ट यातील अर्धा खर्च उचलून हातभार लावते. एवढे दिवस कुणाच्याही सहकार्याशिवाय अशी प्रदर्शने आयोजित करून यशस्वीही केली. पुस्तकांची उत्तम विक्री आणि वाचकांचा उदंड प्रतिसाद हे त्याचे फलित सांगता येईल. ग्रामीण भागातही ग्रंथ प्रदर्शन उपक्रम रुजला आणि वाढलाही.
‘इसाप’च्या ग्रंथ प्रदर्शनाने अनेकदा पावसासारख्या नैसर्गिक संकटाशीही मुकाबला केला. 2008 ते 2016 या कालावधीतील ग्रंथ प्रदर्शनाचा उल्लेख यासाठी करता येईल. प्रदर्शनात मोठा कापडी मंडप, मंडपात 60/70 टेबल असा उघडय़ावरचा ग्रंथसंसार म्हणावा लागेल. अनेकदा वादळी वाऱ्याने, मुसळधार पावसाने मंडप उडून गेले. पुस्तके भिजली परिणामी नुकसान ‘इसाप’च्या पदरात पडले. तरीही प्रदर्शन भरवण्याची डांगेंची जिद्द मात्र कमी झाली नाही. मुंबई मराठी साहित्य संघाच्या भागवत पुरस्काराच्या निमित्ताने त्यांच्या जिद्दीस सलामच केला पाहिजे. माळेगावची यात्रा ही नांदेड पंचक्रोशीत बरीच प्रसिद्ध आहे. देशाच्या विविध भागांतून उंट, घोडे, गायी, बैल आदी जनावरे विक्रीसाठी येत असतात. यात्रेत तमासगिरांचे फडही रंगतात. पंधरा दिवसांच्या यात्रेत ‘इसाप’चे ग्रंथ प्रदर्शनही असते. त्याचप्रमाणे या प्रकाशन संस्थेने खडू- फळा योजना, एकभाषिक पुस्तक खरेदी योजना, द्विभाषिक पुस्तक खरेदी योजना, राजा राममोहन रॉय योजना, शाळा-महाविद्यालयांमधून राबवल्या. महत्त्वाची बाब म्हणजे ‘इसाप’ प्रकाशनाच्या वतीने साहित्य संमेलनही आयोजित केले जाते. कळमनुरी तालुक्यात वाकोडी येथे 18 एप्रिल 22 रोजी ग्रामीण साहित्यकार शंकर वाडेवाले यांच्या अध्यक्षतेखाली पहिले संमेलन पार पडले होते. लेखकाच्या गावी साहित्य संमेलन शिदोरी असाही एक उपक्रम आहे. आजपर्यंत या प्रकाशन संस्थेस राज्य शासनाचे अकरा पुरस्कार लाभले. दत्ता डांगे यांच्यातील लेखकावर प्रकाशनाने मात केल्याने स्वलेखनाच्या प्रवासास स्वल्पविराम मिळाला असावा, असे वाटते. पुढील काळात त्यांच्यातील लेखक, प्रकाशक समांतर वाटचाल करतील ही अपेक्षा.

























































