
रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार परकीय चलनाच्या गंगाजळीत घसरण झाली आहे. 21 ऑक्टोबर रोजी हिंदुस्थानचा परकीय चलन साठा 3.847 अब्ज डॉलर्सने घसरून 524.52 अब्ज डॉलर्स झाला आहे. गेल्या आठवड्यात एकूण साठा 4.50 अब्ज डॉलर्सने घसरून 528.37 अब्ज डॉलर्स झाला होता. परकीय चलनाच्या साठ्यातील ही घट गेल्या अनेक महिन्यांपासून दिसून येत आहे. दोन वर्षांतील नीचांकी पातळीवर आता देशातील परकीय चलन साठा पोहोचला आहे.
देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात जुलै 2020 नंतरची ही सर्वात मोठी घट आहे. एका वर्षात हिंदुस्थानच्या परकीय चलनाच्या साठ्यात 116 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. देशाच्या परकीय चलन साठ्यात ऑक्टोबर 2021 मध्ये, 645 अब्ज डॉलर्सची वाढ झाली होती. रुपयाची घसरण रोखण्यासाठी केलेले प्रयत्न हेच चलन साठ्यात घसरण होण्याचे मुख्य कारण आहे असे सांगितले जात आहे.
चलन साठ्याच्या महत्त्वाचा घटक मानल्या जाणाऱ्या फॉरेन करन्सी ॲसेट्समध्ये 3.593 अब्ज डॉलर्सने घट होऊन ते 465.075 अब्ज डॉलर्स एवढे झाले आहे. त्यामुळे देशातील सोन्याचा साठा 24.7 कोटी डॉलर्सने घसरून 37,206 अब्ज डॉलर्स झाला आहे. युरो, पौंड आणि येन यांसारख्या इतर चलनांचा परकीय चलनाच्या साठ्यामध्ये समावेश आहे. आयएमएफसोबक देशाची रिझर्व पोझिशन 14 मिलियन डॉलर्सनं कमी होऊन 4.799 अब्ज डॉलर्स झाली असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या आठवड्याच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. अलीकडच्या आठवड्यात रुपयाने डॉलरच्या तुलनेत 83.29 ही विक्रमी नीचांकी पातळी गाठली होती. रुपयाची घसरण थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँकेला डॉलर्सची विक्री करावी लागते.




























































