
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) च्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झालेल्या आरोपांची थेट घटनास्थळी जात आरोपातली हवाच काढून टाकली आहे.किशोरी पेडणेकर या आज मीडियाला घेऊन वरळीच्या गोमाता नगरमध्ये गेल्या होत्या तिथे त्यांनी ज्या गाळ्यांवरून त्यांच्यावर आरोप झालेयत गाळेधारकांशी संवाद साधत त्यांचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे दाखवून दिले. यावेळी त्यांनी भाजपवर देखील टिका केली. भाजप वारंवार दबाव तंत्र वापरून माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतेय, असा आरोप त्यांनी केला आहे.
”दर वेळेला किरीट सोमय्या प्रत्येकाला कारण नसताना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात. सर्व अधिकाऱ्यांनी लिहून दिलंय की किशोरी पेडणेकरांचा काहीही संबंध नाही. तरीही ते वारंवार दबाव तंत्राने माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय. वारंवार एकाच गोष्टीवर वार करत राहायचा व समोरच्या व्यक्तीला जेरीस आणण्याचा प्रयत्न करायचा, असं यांचं प्लानिंग आहे. ज्यांना ज्यांना जेरीस आणलं ते भाजपच्या वॉशिंगमशीन मध्ये गेले व स्वच्छ झाले. हा बेगडीपणा मला कधीही जमला नाही. मी गेली अनेक वर्ष वरळी विधानसभेतच राहतेय. माझ्या आयुष्याचं पुस्तक असं उघडं आहे. ते मी उघडं ठेवलंय. रावते कम्पाऊंडमध्ये माझं माहेर आहे. वकील कम्पाऊंडमध्ये माझं सासर आहे. या गोमाता नगरमध्ये राहत असताना मी 2017 ला महापौरपदाचा फॉर्म भरला. त्यावेळी त्यात मी मी केअर ऑफ असं मी नमूद केलेलं आहे. मी टेम्पररी राहत असल्याचा दाखलाही दिला आहे. असं असतानाही कारण नसताना राळ उठवायचं. एकतर तोंड बंद कर नाहीतर काहीच बोलायचं नाही असं करायचा प्रयत्न सुरू आहे”, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
” इथले काही गाळे सोसायटीच्या ताब्यात आहेत. या सोसायटींकडे उत्पन्नाचं साधन नाही. तेथील लोकं ही झोपडपट्टीतून आलेली आहेत त्यामुळे ते मेन्टेनन्स भरू शकत नाही. त्यांनी तसं प्रशासनाला कळवलं आहे. एवढं समोर असूनही असे बिन बुडाचे आरोप ते करत आहेत. त्यामुळे मी आज टाळं चावी घेऊन आली आहे. माझा कुठे काही संबंध असेल तर त्या गाळ्याला मी टाळं लावेन व चावी तुमच्याकडे देईन. तुम्ही पोहोचवा ती संबंधित व्यक्तीकडे”, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
”काय चाललं काय आहे महाराष्ट्रात. राज्यात एवढे प्रश्न असतानाही प्रत्येक बातमीला घोटाळे. तुम्ही तेवढे दूध के धुले आहात का? काल मी सीईओंना देखील फोन केला. सात दिवसात या गाळ्यांबाबतचे निर्णय तुम्हाला द्यावे लागतील. देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या पंधरा दिवसात ते संवेदनशील आहेत हे दाखवलं आहे. एका सामान्य महिलेला तुमच्या माणसाकडून त्रास दिला जातोय. बदनामी केली जातेय, त्याकडे लक्ष द्या अशी मी त्यांना विनंती करते, असंही त्या म्हणाल्या.
”मला कधी भविष्यात निवडणूक लढायची झाली ती इथल्या लोकांमधूनच लढायची आहे. त्यामुळे लोकांना चांगलं माहित आहे. मी कशी आहे. त्यामुळे मीडियाच्या माध्यमातून कसे गेम वाजवू शकतो हे दाखवलं जातंय हे दुर्दैवी आहे. मीडिया बातम्या दाखवतंय तर त्यांनी इथल्या सेक्रेटरी अध्यक्षांशी बोलाच व दुसरी बाजूही दाखवा”, असे आवाहनही किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.





























































