
अमरावती शहरात आज रविवारी दोन मजली इमारत कोसळली. या घटनेमध्ये 5 जण मलब्याखाली अडकल्याने मृत्यू झाला आहे तर 4 जणांना बाहेर काढून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले. दरम्यान, त्यांची स्थिती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांकडून मिळाली.
इमारत कोसळल्यानंतर पाच जणांना मलब्याखालून अग्निशमन विभागाच्या जवानांनी बाहेर काढले. त्यानंतरही मलबा हटविण्याचे काम सुरू होते. यासाठी तीन जेसीबींचा वापर करण्यात आला. शहरात चार महिन्यांत दुसरी इमारत कोसळली. याआधी 14 जुलै रोजी गांधी चौकातील इमारत कोसळली होती. परंतु, इमारत कोसळणार याची आधीच माहिती मिळाल्याने दुकानातील सर्वच जण बाहेर पडले होते. त्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली होती. परंतु, आज व्यावसायिक इमारत कोसळून त्याखाली पाच जण गाडले गेल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
– इमारत जीर्ण व धोकादायक असल्याने महानगर पालिकेद्वारे या इमारतीच्या मालकांना तीन नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तिसऱया नोटीसमध्ये तर इमारत पाडण्याचा इशारा मनपाने दिला होता. परंतु, त्याकडे तळमजल्यावरील पाचही दुकानदारांनी लक्षच दिले नाही.































































