
अवैध वाळूउपसा व वाहतुकीविरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने अवैध वाळू व वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱया 11 होडय़ा कटरच्या साहाय्याने कापून नष्ट करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी दिली.
पंढरपूर तालुक्यातील अवैध वाळूउपसा रोखण्यासह वाळूची अवैध वाहतूक करणाऱयांविरोधात कारवाई करण्यासाठी प्रांताधिकारी गजानन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी पथकाची नेमणूक केली आहे. भीमा नदीपात्रातील पंढरपूर, व्होळे चिंचोली, इसबावी, भटुंबरे, शिरढोण हद्दीत लाकडी होडय़ांद्वारे अवैध वाळूउपसा व वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती महसूल प्रशासनास मिळाली होती.
आज सकाळी महसूलच्या पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळूउपसा करण्यासाठी तैनात असलेल्या 11 होडय़ा पकडून त्या कटरच्या साहाय्याने नष्ट केल्या. सकाळी 9 वाजल्यापासून सुरू केलेली ही कारवाई सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत सुरू होती. भीमा नदीपात्रातील पाणीपातळी मागील काही दिवसांपासून कमी झाल्याने महसूल पथकाद्वारे नदीपात्रात गस्त सुरू होती. पथकाचा सुगावा लागताच अवैध वाळूउपसा करणारे होडीचालक पसार होत होते. महसूल प्रशासनाने यांत्रिक बोटीच्या साहाय्याने थेट नदीपात्रात होडय़ा पकडून कारवाई केली असल्याची माहिती तहसीलदार बेल्हेकर यांनी दिली. या पथकात मंडलाधिकारी विजय शिवशरण, तलाठी प्रशांत शिंदे, राजू वाघमारे, दत्ता कोथाळकर, चांदकोठे कोतवाल, तानाजी लोंढे सहभागी झाले होते.

































































