व्यावसायिकाकडे मागितली 65 लाखांची खंडणी, सराईत रूपेश मारणे आणि साथीदारांविरुद्ध गुन्हा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांधकाम व्यावसायिकाकडून 1 कोटी 85 लाखांच्या बदल्यात 2 कोटी 30 लाख वसूल केल्यानंतर आखणी 65 लाखांची खंडणी मागणाऱ्या सराईत रूपेश मारणे आणि साथीदाराविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेअरमार्केट व्यावसायीकाचे खंडणीसाठी अपहरण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच कुख्यात गज्या मारणे टोळीतील फरार रूपेश मारणे याच्या अडचणीत वाढ झाली आहे.

उमेश प्रसाद वाफगावकर (रा. यशराज अपार्टमेंट,तापोधम सोसायटी, वारजे), नितीन तुकाराम ननावरे (वय 41, विंड बिल व्हिलेज बावधन), अनिल अंबादास लोळगे (वय 40, नवी पेठ सोलापूर), रुपेश कृष्णराव मारणे (वय 38, रा शास्त्रीनगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल केलेल्याची नावे आहेत.

तक्रारदार व्यवसायिकाने उमेश वाफगावकर, अनिल लोळगे, नितिन ननावरे यांच्याकडून बांधकाम व्यवसायासाठी 1 कोटी 85 लाख रुपये घेतले होते. त्याबदल्यात त्यांनी परतफेड म्हणून 2 कोटी 30 लाख रुपये दिले. तरीही सराईत रुपेश मारणे यांच्या सांगण्यावरून आरोपींनी तक्रारदाराकडून 12 फ्लॅट करारपत्राद्वारे सिक्युरिटी म्हणून स्वत:कडे घेतले.

संबंधित फ्लॅट स्वतः लाटण्याचा प्रयत्न करून अर्जदार यांना धमकावले. याप्रकरणी गुन्हे शाखेकडे तक्रारी अर्ज प्राप्त झाला होता. त्यानुसार अर्जाची चौकशी केली असता गुन्हा घडल्याचे निष्पन्न झाले. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहआयुक्त संदीप कर्णिक, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक पोलीस आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी केली.