
आधीच महागाईचे चटके बसत असताना गोरगरीबांच्या पोटाचा आधार असलेला आणि सगळय़ांचाच आवडता वडापाव 3 ते 4 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. पावाच्या दरात यंदा तिसऱयांदा वाढ झाल्याने वडापाव विक्रेते वडापावच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत.
चणाडाळ आणि तेलाच्या किमती वाढल्याने वडापावचे दर वाढवण्यात आले होते. त्यात आता पावाच्या किमती सतत वाढत असल्याने वडापाव खाणेही मध्यमवर्गीय आणि गोरगरीबांना परवडेनासे होणार आहे.
गोरगरीबांचा बर्गर…
वडापावला गोरगरीबांचा बर्गर असेही म्हटले जाते. महाराष्ट्राचा सर्वात आवडता असलेला वडापाव खरं तर सर्वांच्याच पोटाचा आधार आहे. मुंबई, पुण्यासह मोठय़ा शहरांत आणि अगदी गावखेडय़ातही वडापाव खाऊन गुजराण करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळेच वडापावही आवाक्याबाहेर गेल्यास खायचे तरी काय, हा प्रश्न उभा ठाकणार आहे.
वडापाव हे गरीबांचं खाणं आहे. आताच ते त्यांना परवडत नाहीय. पावाचे दर वाढल्यामुळे साहजिकच वडापावचेही दर वाढणारच. पण आम्ही भाव वाढवणार नाही. भाव वाढवले तर ते गरीब ग्राहकांना परवडणार नाही. त्यामुळे आम्हाला गरीबांसाठी नुकसान सहन करून वडापाव विकावे लागणार आहेत, अशी प्रतिक्रिया वडापाव विक्रेते मुकेश चवरकर यांनी दिली.
…तर दर वाढवावेच लागतील
वडापावसाठी आवश्यक तेल, बेसन, बटाटा आदी कच्च्या मालाच्या दरात वाढ झालेली आहे. त्यात लेबर चार्जेस वाढले आहेत. प्रामुख्याने तेलाचे दर वाढल्याने वडापावच्या दरात वाढ करण्याचा विचार होता. मात्र, सध्या तरी दरवाढीचा निर्णय घेतला नाही. तेलाचे दर वाढल्यास वडापावच्या दरात वाढ करावीच लागणार आहे.
– शैलेश जोशी, मालक, जोशी वडेवाले, पुणे
मराठी माणूस परत रस्त्यावर येणार
वडापावच्या गाडय़ा या मराठी माणसांच्याच आहेत. जर वारंवार अशीच महागाई वाढत गेली तर गोरगरीबांचे अन्न असलेला वडापाव त्यांच्यापासून दुरावला जाईल. पर्यायाने याचा फटका मराठी वडापाव विक्रेत्यांनाच होणार. दर वाढले की ग्राहक कमी होणार. मग त्याचा फटका धंद्यावर होणार. मराठी माणसांचा धंदा बंद पडला तर तो रस्त्यावर येणार.
– उमेश पाटील, वडापाव विक्रेता
वडापाव नव्हे, गरीबांचं अन्न
दिवसाला दोनशे-तीनशे कमावणाऱया सामान्य लोकांसाठी, मजुरांसाठी, गरीबांसाठी वडापाव हे दोन वेळचं अन्न आहे. असंख्य लोकं आजही वडापाववर आपली भूक भागवतात. अशा गरीब जनतेसाठी वडापाव हे अन्न आहे. भूक भागवणारे सर्वात स्वस्त अन्न आहे. तसेच हे लाखो मुंबईकरांचेही आवडते खाद्य आहे. या अन्नाला, खाद्याला महागाईची झळ बसायला नको. सरकारने याची दखल घ्यावी.
– प्रवीण गावडे, दादर
महागाईमुळे खायचे वांदे! पाव 50 पैशांनी महागला
आधीच कष्टकऱ्यांचं जगणं अवघड होऊन बसलं होतं. आता खाणंही मुश्किल झालंय. कष्टकऱयांचं, गोरगरीबांचं दोन वेळचं अन्न म्हणजेच वडापाव. पावाचा भाव वाढल्यामुळे आता वडापावही महागणार. पावाचं महागणं हा गोरगरीबांवर अन्याय आहे. आधीच पेट्रोल, डिझेल, गॅस आणि सर्व जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यामुळे सामान्यांना महागाईने मारले आहे. अशा परिस्थितीत अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, महागाईला रोखण्यासाठी ‘देवा पाव रे’ असं साकडं खुद्द गोरगरीब जनतेनेच घातले आहे.
दरवाढीशिवाय पर्याय नाही
ज्यांच्यासाठी सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचेही जेवण हे वडापाव असतं अशा लोकांसाठी वडापावचा दर वाढला तर त्यांनी खायचं काय हा प्रश्न उभा राहतो. मात्र, आम्ही तरी काय करायचे? पाव महागल्यानंतर वडापाव त्याच दरात देणे परवडत नाही, मग दरवाढीशिवाय पर्याय उरत नाही. इतकी महागाई वाढत असताना आम्ही तरी किती दिवस वडापावचे दर स्थिर ठेवणार?
– किसन सारंग, वडापाव विक्रेता
अर्धपोटी राहावं लागेल
सर्व वस्तूंचे दर वाढताहेत तर त्यात वडापावही महागणारच. वडापाव महागला की याची झळ सर्वप्रथम सामान्य नागरिकांना, गोरगरीबांनाच बसणार. वडापाव हे गरीबांचे एकवेळचे अन्न असते. दोन वडापावने त्यांचे पोट भरते. आता त्यांना अर्धपोटीच राहावे लागणार.
– रोहित सावर्डेकर, माहीम
गरीबांचा वडापाव श्रीमंतांचा होणार
गरीबांचा वडापाव हा श्रीमंताचा बर्गर करण्याचा घाट आहे. पावाचा दर वाढला की आपोआप वडापावही महागणार. तो महागला की तो सामान्यांचा राहणार नाही. मग तो श्रीमंताचा होणार. जर वडापाव महागला तर गरीबांनी खायचं तरी काय, हा प्रश्न दर वाढविणाऱयांना कुणी विचारेल का?
– विनायक वर्मा, प्र्रभादेवी
जगण्याच्या खाण्याला महागाईची मार
लाखो गरीब वडापाव खाऊन जगतात. पण आता महागाईच इतकी झालीय की, तीच आता सामान्यांना खाणार. वडापाव महागला तर तो गरीबांनाच मारणार हेच भीषण वास्तव आहे.
– रमेश नारकर, वरळी
- पावाच्या किमतीत वर्षभरात तिसऱयांदा वाढ.
- ब्रेडही महागण्याची शक्यता
- वडापावसह मिसळपाव, पावभाजी, भजीपावही महागणार.
- सध्या 15 ते 20 रुपये इतका वडापावचा दर आहे. त्यात 3 ते 4 रुपयांची वाढ झाल्यास वडापावला 20 ते 25 रुपये मोजावे लागणार आहेत.





























































