
सांगली जिल्ह्यातील बागणी येथे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक आणि आष्टा पोलिसांच्या पथकाने छापा टाकून सुमारे 15 लाख रुपये किमतीची बोगस कीटकनाशके, बुरशीनाशके जप्त केली. याप्रकरणी बजरंग भूपाल माळी आणि शशिकांत विलासराव थोरात या दोघांना अटक करण्यात आली आहे.
वाळवा तालुक्यातील आष्टानजीक बागणी येथील बावची रोडवर असलेल्या एका दुकानातून बोगस कीटकनाशकांची विक्री होत असल्याच्या तक्रारीवरून संबंधित विभागाने छापा टाकून 15 लाख रुपये किमतीची बोगस कीटकनाशके जप्त केली. दरम्यान, एका संशयित मोटारीची तपासणी केली असता, विनापरवाना बनावट शेती औषधे, बुरशीनाशके, कीटकनाशके आढळून आली. त्याची किंमत 14 लाख 43 हजार 800 रुपये आहे. चालक शशिकांत थोरात यांनी ही औषधे मोटारीत ठेवल्याचे आढळले. बेकायदा कीटकनाशकांचा शासकीय विक्री परवाना नसताना साठा केल्याचे निष्पन्न झाले. पथकाने ताब्यात घेतलेले नमुने प्रयोगशाळा, पुणे येथे पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. बजरंग माळी आणि शशिकांत थोरात यांच्या विरोधात विनापरवाना बेकायदेशीर कीटकनाशके, बुरशीनाशकांचा साठा, तसेच शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.































































