
स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहर ठेवण्यासाठी नगरपरिषद स्वच्छता व आरोग्य विभागावाचे 63 सफाई कर्मचारी 6 कचरा गाड्यांच्या मदतीने दररोज सुमारे 8 टन कचरा गोळा करून त्यांची विल्हेवाट लावत आहे. शहरातील प्रत्येक घरात जाऊन स्वच्छता विभागाचे कर्मचारी हा कचरा गोळा करत आहेत. सफाई कामगारांच्या या कामामुळे खेड शहर कचरामुक्त झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
स्वच्छ महाराष्ट्र अभियानाची शहरामध्ये गांभीर्याने अंमलबजावणी सुरू असून हे अभियान केवळ स्पर्धेत बक्षिस मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर स्वच्छतेबाबत लोकचळवळ उभारण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. नगर परिषदेचा मैला प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करण्यात असल्याने खेड नगरपरिषदेला मागील तीन वर्षे सलग स्वच्छ भारत अभियानामध्ये थ्री स्टार जीएफसी हे मानांकन प्राप्त झाले आहे तसेच ओडीएफ प्लस व यावर्षी ओडीएफ प्लस प्लस हे मानांकन प्राप्त झाले आहे तसेच गेली तीन वर्षे खेड नगरपरिषद ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस तयार करत असून बायोगॅस पासून वीजनिर्मीती प्रकल्प कार्यान्वित केला जाणार असल्याची माहिती खेड नगरपरिषदेचे स्वच्छता निरीक्षक महेंद्र शिरगावकर यांनी माध्यमांना दिली.
शहरातील खाजगी व सार्वजनिक शौचालयाची टाकीची साफसफाई केल्यानंतर जमा होणाऱ्या मेल्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिकेने प्रकल्प उभारला आहे. शहरात दररोज ओला व सुका कचरा स्वतंत्रपणे जमा करण्यात येत आहे. दिवसभरात 5 टन सुका आणि 3 टन ओला कचऱ्याचे संकलन केले जाते. यासाठी नगरपरिषदेचे 28 सफाई कर्मचारी आणि कंत्राटी 35 कर्मचारी काम करतात. नगरपरिषदेची जीपीएस प्रणालीयुक्त सहा कचरा संकलन करणारी वाहने असून याद्वारे कचरा डंपिंग ग्राउंडमध्ये डम्प केला जातो. शहरातून जमा होणाऱ्या ओल्या कचऱ्याची बायोगॅस प्रकल्पात विल्हेवाट लावली जात आहे.
सुका कचरा स्वतंत्रपणे जमा केला जात असून त्याचे वर्गीकरण डम्पिंग ग्राउंड मध्ये केले जाते. या कचऱ्यातील प्लास्टिक कचऱ्याचे मशीनद्वारे क्रशिंग करून विक्री केली जात आहे. सॅनिटरी नॅपकिन, डायपर यासारख्या घातक कचऱ्याच्या निर्मूलनासाठी सॅनिटरी डीसपोजल मशीन बसविण्यात आली आहेत. उर्वरित निरुपयोगी सुक्या कचऱ्याला
गॅसिफायरमध्ये टाकून जाळण्यात येते. यापासून तयार होणारी अॅश (राख) ही विविध प्रकारची मातीची भांडी किंवा विटभट्ट्यांवर वापरात येते. आतापर्यंत ही अॅश या ठिकाणी जमा करून ठेवण्यात आली आहे. यापुढे ही राख विविध मातीकामासाठी देण्याचे पालिका प्रशासनाचा मानस आहे, असेदेखील शिरगावकर यांनी यावेळी सांगितले.
जुन्या इमारती, घरे दुरुस्ती आदी प्रकारच्या बांधकामांमुळे शहरात डेब्रिजची समस्या तयार होते, मात्र हे सर्व डेब्रिज एकत्र करण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे. कोणत्याही प्रकारचे डेब्रिज नागरिकांना या कक्षात जमा करता येते. या डेब्रिज साठवणूक केंद्रात जमा होणारे बांधकाम साहित्य व कचरा वर्गीकरण करून नगरपरिषदेमार्फत त्याची विल्हेवाट लावण्यात येते. नगरपरिषदेचा स्वच्छ्ता विभाग दरवर्षी सुमारे 74 लाख रुपये खर्च केला जातो. यामध्ये सफाई कर्मचारी पगार, इंधन, वाहनांची देखभाल दुरुस्ती व इतर साहित्याचा समावेश आहे. खेड नगरपालिका प्रशासनाने ओल्या आणि सुक्या कचऱ्याची योग्य प्रकार विल्हेवाट लावण्याची नियोजन केले असल्याने खेड शहर कचरामुक्त झाल्याचे पाहावयास मिळत आहे.






























































