
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिह्यातील सर्वाधिक विद्यार्थी पात्र ठरले आहेत. राज्याचा एकूण निकाल 23.90 टक्के (पाचवी) आणि 12.54 टक्के (आठवी) लागला आहे. 31 जुलै रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती.
पाचवीच्या परीक्षेसाठी कोल्हापूर जिह्यातून 21,593 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यांपैकी 8991 विद्यार्थी पात्र ठरले असून निकालाची टक्केवारी 41.64 इतकी आहे. तर आठवीच्या परीक्षेला बसलेल्या 12,120 विद्यार्थ्यांपैकी 3434 विद्यार्थी पात्र ठरले असून निकालाची टक्केवारी 28.33 आहे.
राज्याभरातून पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी 4 लाख 18 हजार 55 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3 लाख 82 हजार 697 विद्यार्थी परीक्षेला बसले. यातील 91 हजार 470 विद्यार्थी पात्र ठरले आहेत, तर आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 3 लाख 3 हजार 819 विद्यार्थ्यांपैकी 2 लाख 79 हजार 466 विद्यार्थी परीक्षेला बसले. यापैकी 35 हजार 34 विद्यार्थी पात्र ठरले आहेत.
गुण पडताळणीसाठी 11 नोव्हेंबरपर्यंत अर्ज
जाहीर झालेला निकाल तात्पुरता असून गुण पडताळणी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये 11 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज भरावा लागेल. तसेच गुणांच्या पडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरीता 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाईन पेमेंटद्वारे भरावी लागणार आहे. विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी / ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी 17 नोव्हेंबरपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये ऑनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. दिलेल्या मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येणार आहे.
























































