
दादर पश्चिमच्या हॉकर्स प्लाझाची पालिकेच्या माध्यमातून मोठय़ा प्रमाणात दुरुस्ती केली जाणार आहे. यासाठी पालिका 7 कोटी 93 लाख 68 हजारांचा खर्च करणार आहे. यामध्ये पावसाळय़ात होणारी गळती रोखण्यात येणार असून ड्रेनेज सिस्टीमचीही दुरुस्ती केली जाणार आहे.
नेहमीच गजबजलेला परिसर असलेल्या दादर पश्चिम प्लाझा चित्रपटगृहामागे महापालिकेचे हॉकर्स प्लाझा (म्युनिसिपल मार्पेट) आहे. पालिकेने 2000 मध्ये पाच मजली मार्पेट बांधले आहे. या ठिकाणी 865 गाळे आहेत, मात्र हॉकर्स प्लाझाची सद्यस्थितीत दुरवस्था झाली आहे. पावसाळय़ात छतातून पाणी गळती, भिंतीला तडे गेले असून ड्रेनेज सिस्टीम जुनी झाली आहे. त्यामुळे हॉकर्स प्लाझाची तातडीने दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिका प्रशासनाने निविदा प्रक्रिया राबविण्यास सुरुवात केली आहे.
अशी आहे स्थिती
तीन मजली हॉकर्स प्लाझाचे बांधकाम सन 2000 मध्ये करण्यात आले असून या ठिकाणी एकूण 865 गाळे आहेत, तर चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर पालिका कार्यालये आहेत. तब्बल 22 वर्षांपूर्वी हॉकर्स प्लाझा बांधण्यात आले होते. पावसाळय़ात या ठिकाणी होणाऱ्या गळतीमुळे गाळेधारकांसह ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागतो. इमारतीच्या बाहेरील काचेचे आवरणही पडण्याचा धोका संभवतो. त्यामुळे इमारत व देखभाल विभागाच्या माध्यमातून दुरुस्ती करण्यात येणार आहे.



























































