सांगली महापालिकेने अवैध फ्लेक्स, शेड हटविले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सांगली महापालिका प्रभाग समिती एक अंतर्गत येणाऱ्या मारुती रोड, हरभट रोड, मेन रोडवर रस्त्यांवर विनापरवाना लावलेले फलक आणि विनापरवाना शेड महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले.

सांगली शहरातील मारुती रोड, हरभट रोड, कापड पेठ, मेनरोड आदी बाजारपेठेतील मुख्य रस्त्यांवर व्यापाऱ्यांनी आपल्या व्यवसायाचे फलक रस्त्यावरच लावले होते. अनेकांनी व्यवसायाचे अतिक्रमण रस्त्यापर्यंत केले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर आयुक्त सुनील पवार यांनी अतिक्रमण काढण्याच्या सूचना सहायक आयुक्त सहदेव कावडे यांना दिल्या होत्या. त्यानुसार सोमवारी या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

बाजारपेठेतील रस्त्यांवर व्यावसायिकांनी व्यवसाय जाहिरात फलक, अतिक्रमित शेड उभारून अतिक्रमण केले आहे. त्यामुळे सहायक आयुक्त सहदेव कावडे यांच्या आदेशाने मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मारुती रोड, हरभट रोड, मेनरोडवर रस्त्यांवर ठेवलेले बोर्ड, तात्पुरत्या शेडवर कारवाई करत अनेक फलक जप्त केले. तसेच, पुन्हा रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक फलक, शेड उभारू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या. कारवाईत स्वच्छता निरीक्षक प्रनिल माने, धनंजय कांबळे, अतिक्रमण विभागाचे विक्रम घाडगे आणि कर्मचाऱयांनी सहभाग घेतला होता.