खाऊच्या गोष्टी – सिनेमाचा साथीदार पॉपकॉर्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> रश्मी वारंग

रंग, रूप, गंध, चव या सगळय़ा आघाडय़ांवर अतिशय साधेपणा असूनही प्रचंड लोकप्रिय झालेले फार कमी पदार्थ आहेत. त्यातला सर्वोत्तम नमुना म्हणजे पॉपकॉर्न.

मॅक्सिकोत दहा हजार वर्षांपूर्वी शोध लागलेल्या मका नामक धान्याच्या लाह्या भविष्यात इतक्या भाव खातील याची कुणीही कल्पना केली नसेल. मक्याच्या दाण्यांपासून लाह्या बनवण्याची कला साधारण हजार एक वर्ष जुनी आहे. सर्वच धान्यांचे पचन सोपे व्हावे म्हणून धान्य भाजून, उकडून खाण्याचा प्रयोग करणाऱ्या मानवाला या लाह्यांचा कधीतरी शोध लागला असावा. मात्र पदार्थाशी एखादी दंतकथा जोडली तर त्याची खुमारी वाढते. अशीच कथा मेक्सिकोमधून प्रवास करत अमेरिकेत आलेल्या पॉपकॉर्नबद्दल सांगितली जाते. कोणे एकेकाळी कोणत्या तरी गावात इतका उन्हाळा होता, इतका उन्हाळा होता की, उभ्या पिकातले मक्याचे दाणे लाह्या होऊन शेतात उडू लागले. या प्रकाराने गाई गुरे गोंधळून गेली आणि नंतर लाह्या अर्थात पॉपकॉर्न बनवणे सर्रास सुरू झाले.

ही कथा अतिशयोक्तीपूर्ण असली तरी एकूणच मक्याच्या लाह्या लोकप्रिय झाल्या हे नक्की. मात्र त्यांना आजच्या सारखं वलय अजिबात नव्हतं. आपल्याकडे शेतकरी शेतात हुरडा, शेंगा  भाजून खातात तशाच या लाह्या फुलवून शेतकरी घरच्या घरी खात.

आता प्रश्न उरतो, पॉपकॉर्नचं सिनेमागृहाशी नातं कसं जुळलं? तर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेमध्ये साखरेच्या तुटवडय़ामुळे पॉपकॉर्नचा खप तिप्पट झाला. याच कारणामुळे सिनेमागृहातील आईस्क्रीम, आईसकँडी महागली. तेव्हा महामंदीच्या त्या काळात सिनेमागृहांना पॉपकॉर्नने खूप आधार दिला. स्वस्त आणि मस्त खाणं म्हणून सिनेमागृहात पॉपकॉर्न लोकप्रिय झाले ते आजतागायत कायम आहेत. मधल्या काळात कचरा खूप होतो या सबबीखाली पॉपकॉर्नवर सिनेमागृहात बंदी घातली गेली, पण हा दुरावा जास्त काळ टिकू शकला नाही. सिनेमागृहातील पॉपकॉर्नच्या किमती पाहता, चार आण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशी अनेकांची भावना होते. जगभरात अशी कितीतरी सिनेमागृहे आहेत जिथे तिकीट विक्रीपेक्षा पॉपकॉर्नच्या विक्रीतून जास्त पैसे कमावले जातात.

 सिनेमागृहातील महागडे पॉपकॉर्न असोत किंवा रस्त्यावरच्या गाडीवर भल्या मोठय़ा कढईतील वाळूत फुलणाऱ्या मक्याच्या लाह्या असोत, पिवळय़ा जर्द दाण्यातून टणाटण उडय़ा मारत बघता बघता फुलणारं हे कौतुक म्हणजे निव्वळ चसका ठरतं. पॉपकॉर्न तयार होतानाचा दरवळ तुमच्या पायांना खेचून पॉपकॉर्नकडे नेतो. टबमधून पॉपकॉर्नची रास रिचवताना सिनेमा बघता बघता हाताला कधी तळ लागतो कळतंच नाही. या शुभ्र फुलोऱ्याच्या साधेपणात आपण हरवून गेलेले असतो हेच खरं!

अशा या लाह्यांना ‘पॉपकॉर्न’ असं कल्पक नाव जॉन रसेल बार्लेट यांनी दिलं. त्यांच्या 1848 प्रकाशित पुस्तकात ‘पॉपकॉर्न’ असा शब्द पहिल्यांदा वापरला गेला आणि तो भलताच लोकप्रिय झाला.

1945 साली मायक्रोवेव्ह पॉपकॉर्नची सोय झाली आणि पॉपकॉर्न घरोघरी पोहोचले. अमेरिकेतील इलीनॉस राज्याने या पॉपकॉर्नला स्टेट स्नॅक्सचा दर्जा दिला आहे.