
>> संजय कुळकर्णी
प्रत्येक वाहिनीवरून ज्या-ज्या मालिका प्रसारित होताहेत त्या पाहताना प्रकर्षानं जाणवतं की, त्यात लहान मुलांच्या व्यक्तिरेखा या असतातच. तो एक नवीन ट्रेंड निर्माण झाला आहे का, हासुद्धा महत्त्वाचा मला जाणवू लागलेला आहे. आता हेच पहा की, मराठी हिंदी चित्रपटातील बाल कलाकार तरुणपणी हीरो बनलेले नाहीत. अपवाद असेलही, पण ती वस्तुस्थिती आहे. मालिकेत भूमिका करणारे जे बाल कलाकार आहेत त्यातील काही आध्यात्मिक मालिकेत दिसतात. त्यांना आपण ज्या मालिकेत भूमिका करीत आहोत त्या गुरूची आणि स्वतः साकारणाऱया व्यक्तिरेखेची माहिती असेल का असे अनेक प्रश्न माझ्या मनात होते. म्हणून काही बाल कलाकार आणि त्यांच्या पालकांना भेटलो. त्यांच्याशी बोलताना जाणवलं की, हल्लीची पिढी ही हुशार आहे. कारण प्रत्येकाने ते साकार करणारी व्यक्तिरेखा अभ्यासलेली आहे हे बोलताना समजले.
कलर्स मराठीवरची ‘योग योगेश्वर जय शंकर’ या मालिकेत बाल शंकरची भूमिका करणाऱया आरुष बेडेकर हा बाल कलाकार नगरचा. तेथून तो चित्रीकरणासाठी नाशिकला येतो. आरुष म्हणाला, मला महाराज कोण याबद्दल काहीच माहीत नव्हतं. आमचे क्रिएटिव्ह हेड यांनी सर्व माहिती दिली. माझी ही पहिलीच मालिका असल्यामुळे मला या माध्यमाची ओळख नव्हती. लहान असताना 10 ते 14 नाटय़छटा या केलेल्या. चित्रीकरणाच्या वेळी शिकत गेलो. धनकवडीला गेलो. महाराजांचं दर्शन घेतलं. सुंदर आहे ते मंदिर. आत शिरल्याक्षणीच मला भक्तांनी ओळखलं. महाराजांचे इतके भक्त असतील ते पाहून मी अवाक झालो.
कलर्स मराठीवर ‘जय जय स्वामी समर्थ’ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांत लोकप्रिय आहे. कृष्णपाच्या भूमिकेतील नित्या पाटील बालमोहन शाळेचा विद्यार्थी. तो म्हणाला, ‘माझी ही दुसरी मालिका. दामिनीमध्ये भूमिका केली होती. सेटवर धम्माल मस्ती करतो. मीच फक्त लहान असल्यामुळे मोठय़ांबरोबर गप्पा मारतो. शाळेच्या सहकार्याशिवाय मला मालिकेत काम करता आलं नसतं. ते मला सांभाळून घेतात.’
सोनी मराठी वाहिनीवरील ‘बायोची मोठी स्वप्न’ मालिकेत बायोची भूमिका करणारी रुची नेरुरकर कुडाळ तालुक्यातील नेरूर गावची. रुची म्हणाली ‘भूमिका करताना इतरांकडून खूप काही शिकायला मिळतं. पहिलीच मालिका असल्यामुळे पहिल्या दिवशी मला माझ्या दिग्दर्शकाने समजाऊन सांगितलं. त्यांच्याकडून त्या माध्यमाची ओळख झाली. माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि योगायोगाने मालिकेचे कथानकसुद्धा त्यावरच बेतलेले आहे.
मुलांना पाहणं प्रेक्षकांना आवडतं
या बाल कलाकारांशी बोलल्यावर त्यांच्या पालकांशी बोलावं म्हणून त्यांच्याशी संपर्क साधला असता सर्वांचे एकच मत पडलं की त्यांचा ओढा वयात आल्यावर कुठे असेल त्यावरच सर्व अवलंबून आहे. त्यांना अभिनयच कर म्हणून तगादा त्यांच्यामागे लावणार नाही. आरुषचे वडील हे नगरमध्ये रंगकर्मी आहेत. त्यामुळे आरुषवर नाटकांचे संस्कार होणारच असं सांगताना ते म्हणाले, ‘त्याला माध्यमाची आवड आहे. चटकन नाही म्हणणं हा त्याचा स्वभाव नाही. त्यामुळे कुठलीही अवघड गोष्ट तो साध्य करून दाखवतो. लहान मुलं मालिकेत दिसतात हा माझ्या मते ट्रेंड नसावा. हा वाहिनीचा एक भाग आहे. मुलांना पाहणं प्रेक्षकांना आवडतं. त्याचं भविष्य आम्ही सेट केलेले नाही. त्याला भविष्यात चांगल्या भूमिका मिळत राहणं आणि जर त्या मिळाल्या तर त्याचं श्रेय आरुषलाच.’



























































