मुतखड्याचा शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची किडनी गायब, उत्तर प्रदेशातील प्रकार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुतखडा काढण्याची शस्त्रक्रिया करण्याच्या बहाण्याने अलीगढमधील एका खाजगी रुग्णालयात रुग्णाची डावी किडनी काढल्याचा प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. या घटनेमुळे 53 वर्षीय रुग्णाला धक्का बसला आहे. कासगंज येथील मुख्य विकास अधिकारी कार्यालयात कार्यरत असणारे सुरेश चंद्रा यांना पोटात तीव्र वेदना झाल्यामुळे ही बाब उघडकीस आली. त्यानंतर त्यांनी अल्ट्रासाऊंड चाचणी केली असता रिपोर्टमध्ये त्यांची डावी किडनी गायब असल्याचे दिसून आले. पीडित व्यक्तीने याबद्दल तक्रार केली असता मुख्य विकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

कासगंज जिल्ह्यातील नागला ताल गावातील रहिवासी असणारे सुरेश यांनी या घटनेबद्दल सांगितले की, 14 एप्रिल रोजी ऑपरेशनपूर्वी अल्ट्रासाऊंड चाचणी घेण्यात आली. डाव्या मूत्रपिंडात मुतखडा असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. कासगंजमधील एका खाजगी क्लिनिकच्या बिलिंग काउंटरवरील व्यक्तीने मला अलीगढमधील क्वार्सी बायपास रोडवरील एका खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. या रुग्णालयात मला 14 एप्रिल रोजी दाखल करण्यात आले. त्याच दिवशी माझी शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयातील डॉक्टरांनी मला कळवले की माझा किडनी स्टोन काढला गेला आहे आणि औषधांची यादी लिहून दिली. त्यानंरतर त्यांनी मला 17 एप्रिल रोजी रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.

29 ऑक्टोबर रोजी, मला पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. यावेळी मी कासगंजमधील एका डॉक्टरांकडे गेलो, त्यांनी माझे पूर्वीचे अहवाल पाहिल्यानंतर त्यांना माझ्या पोटाच्या डाव्या बाजूला शस्त्रक्रियेच्या खुणा दिसल्या. यावेळी त्यांनी मला अल्ट्रासाऊंड स्कॅन करण्याचा सल्ला दिला. यावेळी माझी डावी किडनी गहाळ झाल्याचे कळले आणि मला धक्का बसला. या संपूर्ण घटनेबद्दल मी वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांना कळवले. त्यांनी मला योग्य कारवाईचे आश्वासन दिले आहे.