
>>प्रा. अनिल कवठेकर
प्रेक्षकांना निखळ आनंदाची सावली देणारा कितीही वेळा पाहिलं तरी कंटाळा न आणणारा अमोल पालेकर आणि उत्पल दत्त यांचा गोलमाल चित्रपट म्हणजे फक्त मनोरंजन.
गोलमाल’ म्हणजे गडबड, गोंधळ, फसवाफसवी, काहीतरी काळेबेरे, खोटेपणा असंच काहीसं. जेव्हा एखादा विनोदी चित्रपट निर्माण करायचा असतो तेव्हा त्यासाठी विनोदी कथेच्या ओळीचे एक झाड सापडायला हवे असते. एकदा का ते झाड सापडले की, मग त्या झाडावर दिग्दर्शनाचे, पटकथेचे, अभिनयाचे आणि संवादाचे सुंदर कलम करायचे. ते कलम जमले की, त्यातून तयार होणारे चित्रपटाचे झाड अनेक वर्षे प्रेक्षकांना निखळ आनंदाची सावली देते, करमणुकीची मधूर फळे देत राहते आणि वाङ्मयचौर्य करणाऱयांसाठी कथाबीज देत असते. ‘गोलमाल’ हा असाच एव्हरग्रीन चित्रपट आहे. दर्जेदार, उत्तम, सहकुटुंब सहपरिवार पाहता येणाऱया चित्रपटाची निर्मिती करण्यात हृषीकेश मुखर्जी यांचा सिंहाचा वाटा आहे, असे म्हणावे लागेल. जसे खूबसूरत, चुपके चुपके आणि आताचा ‘गोलमाल’, तिघांचा पाया हा विलक्षण वेगळा व्यक्तिमत्त्वाच्या स्वभाव वैशिष्टय़ांवर आधारलेला आहे. ‘खूबसूरत’मधील कडक शिस्तीची आई, ‘चुपके चुपके’मधील अत्यंत हुशार आणि शुद्ध हिंदीची आवड असणारा जिजाजी, तर ‘गोलमाल’मधील मिशीवर प्रेम करणारा, साधेपणावर प्रेम करणारा मुलीचा बाप आणि तो बाप जर उत्पल दत्त असेल तर काय धमाल उडते ते चित्रपट पाहतानाच आपल्या लक्षात येते. हा नायिकेचा बाप म्हणजे उत्पल दत्त होय. त्यांचे चित्रपटात भवानी शंकर असे नाव आहे. भवानी शंकर ज्याचे मिश्यांवर खूप प्रेम आहे. जिस की मूंछे साफ होती है, उसकी नियत साफ नही होती है! हे विलक्षण वेगळे असे जीवनाचे तत्त्वज्ञान स्वीकारणारा मुलीचा बाप त्याच्या चष्म्यातून मुलीसाठी वरसंशोधन करणार हे आलेच. त्यातून उडणारी गंमत म्हणजे ‘गोलमाल’ होय. भवानी शंकरची एक फर्म आहे, तिथे त्याला एका अकाऊंटंटची आवश्यकता आहे आणि नुकताच बी.कॉम. झालेल्या आपल्या नायकाला नोकरीची आवश्यकता आहे. इथून कथेला प्रारंभ होतो. भवानी शंकरच्या मुलीचे नाव ऊर्मिला. तिची भूमिका अतिशय सुंदर, गोड चेहऱयाच्या बिंदिया गोस्वामीने केलेली होती. लेखकाने कथेमध्ये सातत्याने गोंधळ निर्माण होईल अशी कथेची व पटकथेची रचना केलेली आहे. त्या गोंधळातून नवा गोंधळ व्हायला हवा अशी गोंधळाची मालिका आपल्याला मनमुराद हसवण्यासाठी पडद्यावर घडत असते आणि तिचा वेगही बरोबर राखण्यात दिग्दर्शक यशस्वी झालेला आहे.
अमोल पालेकर म्हणजे रामप्रसाद हा त्या काळातील तरुणांप्रमाणे स्वच्छंदीपणे जगणारा, खेळांची, चित्रपटांची, गाण्यांची आवड असणारा तसेच चित्रविचित्र रंगांचे शर्ट घालणारा तरुण आहे. अमोल पालेकरचा चेहरा म्हणजे आपल्या माणसातील नायकाचा चेहरा आहे. त्याला पाहताना तो मुळीच परका वाटत नाही. तो चेहरा आपल्या नातेवाईकांत, मित्रांमध्ये कुठेतरी आपण पाहिलेला आहे असा वाटतो. तो नुकताच पास झालेला आहे. त्याला नोकरी हवी आहे. त्याचे मामा डॉक्टर अंकल म्हणजे डेव्हिड याने त्याच्यासाठी नोकरीसुद्धा पाहिली आहे व ती मिळण्यासाठी नेमके काय करायला हवे हेही डेव्हिड म्हणजे डॉक्टर अंकलला माहिती आहे. गंमत अशी आहे की, जे जगणे रामप्रसाद जगत आहे, त्याच्या अगदी उलट जगणे त्या नोकरीसाठी जगायचे आहे. त्याला झब्बा, कुडता घातला पाहिजे. त्याला असलेल्या चित्रपटाच्या, गाण्याच्या, खेळाच्या आवडीविषयी त्याने कोणताही विचार भवानी शंकरसमोर व्यक्त करायचा नाही. उलट मला अकाऊंटच्या माहितीशिवाय दुसरे काही माहीत नाही असे दाखवले तरच तिथे नोकरी मिळणार आहे, हा या चित्रपटाचा मुख्य धागा आहे. यात विरोध, गरज, स्वप्न आहे, पाठलाग आहे, फसवणे आहे. आणि म्हणूनच धमाल आहे.
यासाठी रामप्रसादला पहिल्यांदा झब्बा शोधावा लागतो. तो झब्बा घालून इंटरह्यू दिल्यानंतर नोकरी मिळते. या बाह्य रूपात जगताना आतला रामप्रसाद त्याला स्वस्थ बसू देत नाही. याचवेळी त्याला मॅच पाहण्याची हुक्की येते. यासाठी मित्राला ऑफिसमध्ये पह्न करायला व आईची तब्येत बरी नाही असा निरोप द्यायला सांगतो. मॅचसाठी जाताना वेगळे कपडे तयार ठेवतो. रामप्रसाद मित्रासोबत बदललेले कपडे घालून फुटबॉलचा सामना पाहायला जातो आणि स्वतः भवानी शंकर अचानक तिथे तो सामना पाहायला येतो. तो रामप्रसादला तिथे पाहतो. त्याचे बोलणे ऐकून त्याचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. तो भयानक संतापतो. दुसऱया दिवशी तो रामप्रसादला डायरेक्ट प्रश्न विचारतो. रामप्रसाद भोळेपणाचा आवाज काढून तो माझा जुळा भाऊ लक्ष्मणप्रसाद आहे, असे खोटे सांगतो, पण एक खोटे सांगितल्याने तो पुन्हा फसतो. कारण रामप्रसादबद्दल भवानी शंकरला खूप प्रेम आहे. त्याला वाईट वाटतं की, त्याचा हा लक्ष्मण प्रसाद भाऊ वाया गेलेला आहे. त्याची सगळी जबाबदारी रामप्रसादवर पडते म्हणून आपण त्याला नोकरी द्यावी. म्हणून तो त्याला सांगतो की, तुझ्या त्या लक्ष्मणप्रसादला माझ्याकडे पाठव. म्हणजे मी त्याला काहीतरी नोकरी देतो. जे खोटं अमोल पालेकरने सांगितलेलं असतं ते पुन्हा सत्यात आणण्याची वेळ त्याच्यावर येते आणि ही सगळी धावपळ हाच सगळा तो ‘गोलमाल’ आहे. असं म्हणतात, सगळ्यात मोठे दुःख हे अपेक्षाभंगाचे असते आणि सगळ्यात मोठा विनोदसुद्धा अपेक्षाभंगाचाच असतो. रामप्रसादच लक्ष्मणप्रसादचे रूप घेऊन म्हणजे आपल्या मिश्या भादरून भवानी शंकरला भेटायला जातो आणि त्याचा खूप अपमान करतो. तरीही भवानी शंकर त्याला नोकरी देतो. म्हणजे आता रामप्रसाद आणि लक्ष्मणप्रसाद अशा दोन भूमिका सातत्याने करण्याची वेळ अमोल पालेकरवर येते.
तिकडे आईची भूमिका करणाऱया बाईला भवानी शंकर एका मोठय़ा पार्टीत पाहतो, तेव्हा त्याला तिचा संशय येतो. तो तिचा पाठलाग करतो, तिच्याशी बोलतो आणि सत्य शोधण्यासाठी रामप्रसादच्या घरी जातो. दीना पाठकच्याही हे लक्षात येते म्हणून दीना फाठकही रामप्रसादच्या घरी पोहोचते. भवानी शंकर दारात बसलेला म्हणून ती किचनच्या छोटय़ा खिडकीतून कशीबशी आत शिरते. तिला पाहिल्यावर अमोल पालेकरने ‘‘मां…तूम आ गई मां’’ हे बोलताना जो अभिनय केला आहे तो तर लाजवाब आहे. हा संवाद बोलताना त्याच्या चेहऱयावर आनंद,भीती, समाधान, आश्चर्य, चमत्कार या सगळ्या भावना एकत्रितपणे उमटतात आणि त्याच्या आवाजाच्या ध्वनीतून त्या आपल्यापर्यंत पोहोचतातसुद्धा. हा गोंधळ सारखा वाढत जातो. शेवटच्या दृष्यात रामप्रसादने लावलेली मिशी निघते. ते भवानीशंकरच्या लक्षात येते. त्याला असं वाटतं की, लक्ष्मणप्रसादने, रामप्रसादचा खून केला आहे. तो त्याला पोलिसांच्या ताब्यात देणार तेवढय़ात रामप्रसाद पळून जाण्यात यशस्वी होतो. त्याच्या सोबत ऊर्मिला आहे. भवानी शंकरला ते चकमा देतात. भवानी शंकरला पोलीस पकडतात. तिथून तो घरी येतो. शेवटी डेव्हिड सगळ्या गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. सगळ्यांचा एक ग्रुप पह्टो काढला जातो. त्यात भवानी शंकरने आपल्या मिश्या कापलेल्या असतात. पळापळ, धावपळ, नायकाची धावपळ, आईची धावपळ, बहिणीची धावपळ, भवानी शंकरची धावपळ, भवानी शंकरने रागात, संशय आल्यानंतर, चिडल्यानंतर आणि आनंदात कधी घशातून तर कधी गळ्यातून जे चित्रविचित्र आवाज काढले आहेत, त्या आवाजांची तर वेगळीच मजा अनुभवायला मिळते. माझा आवडता संगीतकार आर. डी. बर्मन याने जेम्स बाँडच्या चित्रपटातील त्या सुप्रसिद्ध टय़ूनचे अप्रतिम असे केलेले विडंबन त्या शेवटच्या दृश्यात आणखी रंगत आणते. चित्रपटाचे इंजिन असे विनोदाचे डबे घेऊन त्याच्या मार्गावरून सुसाट धावत असते. मनोरंजनाच्या या मिनी ट्रेनमध्ये बसून प्रत्येक स्टेशनवर बसणाऱया विनोदाच्या धक्क्याने आपण आनंदित होऊन जीवनातील सगळे ताणतणाव दूर सोडून पुढे पुढे जात असतो. कितीही वेळा पाहिलं तरी पंटाळा न आणणारा हा चित्रपट म्हणजे ऑलटाइम मनोरंजन आहे.
(लेखक चित्रपट अभ्यासक आहेत)






























































