
दळणवळण अतिशय सुखकर व्हावे ग्रामीण भाग हा शहराला जोडला जावा तसेच शहरातील रस्ते हे महानगर क्षेत्राला जोडले जावेत व एक मोठे जाळे रस्त्याचे तयार व्हावे या उद्देशाने केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून अनेक प्रकल्प सुरू झाले आहेत. नगर जिह्यामध्येही तीन राष्ट्रीय महामार्गांचे काम सुरू आहे. त्यातच आता नव्याने नगर-पुणे-संभाजीनगर असा नवा महामार्ग तयार होणार आहे. त्यामुळे आता नगर-पुणे अंतर अवघ्या 70 ते 75 मिनिटांमध्ये पार करता येणार आहे.
नगर जिल्हा भौगोलिकदृष्टय़ा उत्तर महाराष्ट्रात अर्थात नाशिक विभागीय आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. मात्र, नगरकरांचा दैनंदिन संबंध पुणे जिह्याशी जास्त येतो. शिवाय नगर ते नाशिक हे अंतर सध्या चार तासांचे असून, पुणे ते नगर अंतर अडीच तासांचे आहे. त्यामुळे नगरकरांना पुणे नेहमीच जवळचे वाटते. भविष्यात नगरकरांचा पुण्याचा प्रवास आणखी वेगात होणार असून, प्रस्तावित संभाजीनगर-नगर-पुणे एक्स्प्रेस वेमुळे नगरकर अवघ्या सव्वा तासांत पुण्यात पोहोचणार आहेत. 100 मीटर रुंदीचा हा एक्स्प्रेस-वे राहणार आहे. नगर जिह्यात त्यासाठी प्राथमिक अंदाजानुसार 1300 हेक्टर क्षेत्र भूसंपादित होणार आहे.
संभाजीनगर-नगर-पुणे एक्स्प्रेस वे दहा पदरी असणार आहे. नगर जिल्ह्यातील नगर, नेवासे, शेवगाव, श्रीगोंदे, पारनेर व पाथर्डी या सहा तालुक्यांतून जाणार आहे. नगर जिह्यातील या एक्स्प्रेस वेचे अंतर 124 किलोमीटर असणार आहे. तर, पुणे ते संभाजीनगर 270 किलोमीटरचे अंतर असणार आहे. या एक्स्प्रेस वेवर वाहनांचा वेग ताशी 100 ते 120 किलोमीटर असणार आहे. सध्या असलेल्या नगर-संभाजीनगर रस्त्याने जाणाऱया वाहनांचा ताशी वेग 60 ते 80 किलोमीटरचा आहे. विशेष म्हणजे सध्या रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वेग आणखी मंदावला असून, त्यातच अनेक ठिकाणी होणाऱया वाहतूककोंडीचा त्रासही वाहनधारकांना सहन करावा लागत आहे.
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांतून हा महामार्ग संभाजीनगरकडे जाणार आहे. 100 मीटर रुंदीचा हा एक्स्प्रेस वे राहणार असून, अंदाजे 1300 हेक्टर क्षेत्र भूसंपादित केले जाणार आहे. भूसंपादनापूर्वीचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. पुणे विभागाअंतर्गत भूसंपादन प्रक्रिया होणार असल्यामुळे थोडासा विलंब लागत आहे.
– मिलिंद वाबळे, वरिष्ठ अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण.
समृद्धीसह 3 राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू
नगर जिह्यात सध्या कल्याण-निर्मल (विशाखापट्टणम) महामार्गाचे काम सुरू असून, ते काम आता पाथर्डी तालुक्याच्या पुढे आले आहे. याशिवाय सुरत-हैदराबाद महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे लवकरच या महामार्गाचेही काम सुरू होण्याचा अंदाज आहे. शिवाय मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाचे नागपूर ते शिर्डी या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या टप्प्यात लवकरच वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. नगर-मनमाड राज्य महामार्गाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले आहे. हा राज्यमार्ग आता राष्ट्रीय महामार्गामध्ये रूपांतरित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या महामार्गाच्या नगर ते कोपरगाव या 80 किलोमीटरसाठी तब्बल 800 कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भूसंपादन अधिकाऱयांच्या नियुक्तीनंतर येईल वेग
संभाजीनगर-नगर-पुणे एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनासाठी नगर जिह्यातील लोकप्रतिनिधींची बैठक 3 ऑक्टोबरला झाली. या बैठकीत एक्स्प्रेस वेच्या भूसंपादनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. आता बैठकीनंतर महसूल जिल्हा प्रशासन भूसंपादनासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या भूसंपादन अधिकाऱयाची नियुक्ती करणार आहे. नियुक्तीनंतर पुढच्या प्रक्रियेला
वेग येईल.
शहरापासून 55 मीटर अंतरावर एक्स्प्रेस वे
प्रस्तावित संभाजीनगर-नगर-पुणे एक्स्प्रेस वे कुठून जाणार याची नगरकरांना उत्सुकता आहे. नगर शहरापासून अर्थात जुन्या नगर-संभाजीनगर रस्त्यापासून 55 मीटर अंतरापासून हा एक्स्प्रेस वे जाणार आहे. नगर शहराबाहेरील केडगाव रस्त्याला जोडून हा एक्स्प्रेस वे असणार आहे. त्यामुळे नगरकरांना जुन्या संभाजीनगर-पुणे रोडने जाऊन नव्या एक्स्प्रेस वेला जाता येणार आहे.






























































