
दीपावली सलग सुट्टीकाळात तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथे मंदिर परिसरात प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. विभागीय पोलीस अधिकाऱयांच्या पुढाकाराने संयुक्त बैठक झाली. सर्वांच्या सहकार्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमाकाळात प्रचंड गर्दी होऊनही वाहतूककोंडी कमी प्रमाणात झाली. मात्र, उत्सव संपल्यानंतर शनिवारी मंदिर परिसरात पुन्हा वाहतूककोंडी झाली होती. ही वाहतूककोंडी कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासह मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
दीपावली सलग सुट्टीकाळात अक्कलकोटमध्ये भाविकांची प्रचंड गर्दी झाली होती. या गर्दीमुळे वाहनांची प्रचंड कोंडी, पार्ंकगसाठी अपुरी जागा, अतिक्रमण, अरुंद रस्ते, नाल्यांची दुर्गंधी आदी समस्या ऐरणीवर आल्या होत्या. यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाली होती.
विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांनी पुढाकार घेऊन पोलीस प्रशासन, महसूल, नगरपालिका प्रशासन, देवस्थान, अन्नछत्र मंडळाची संयुक्त बैठक घेऊन मोठे नियोजन केले. यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेच्या काळात महाराष्ट्रातील पायी दिंडी सोहळे मोठय़ा प्रमाणात येऊनही वाहनांची कोंडी झाली नाही. सर्वच विभागांनी आपले कर्तव्य चोख बजावल्याने विभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर यांच्या पुढाकाराने सर्व सुरळीत झाले. मात्र, या कारवाईत सातत्य राहिले नसल्याने शनिवारी मंदिर परिसरात पुन्हा वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. यामुळे गुरुवार, शनिवार, रविवारसह सलग सुट्टय़ांमुळे होणारी गैरसोय टाळण्याकरिता शासनाने तातडीने मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्यासह पादचारी मार्ग, रस्ते दुभाजक, पार्किंगसाठी जागा निश्चित करणे, दर्शनरांगेसाठी स्कायवॉक, मंदिर परिसरात अवजड वाहनांना प्रवेशबंदी करण्याची गरज आहे.
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करावी, अशी मागणी होत आहे. पोलीस, महसूल, नगरपालिका यांच्या नियोजनामध्ये सातत्य असणे आवश्यक आहे. अक्कलकोट तीर्थक्षेत्री येणारे 80 टक्के भाविक चारचाकी वाहनांनी, तर 20 टक्के भाविक बस, रेल्वे आदी मार्गांनी येतात. त्यामुळे अक्कलकोटमध्ये वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी ठोस नियोजन करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.






























































