
शिवगंधार आणि ग्रंथाली प्रकाशनातर्फे रत्नागिरीचे दिवंगत नाटककार, दिग्दर्शक अविनाश फणसेकर लिखित ‘भगवान गौतम बुद्ध’ या नाटकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन लवकरच मुंबईत होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी म्हणजे दि. 6 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मान्यवर साहित्यिक डॉ. प्रज्ञा दया पवार, डॉ. राजेंद्र गवई आणि सुप्रसिद्ध अभिनेते डॉ. नितीश भारद्वाज यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती शिवगंधारच्या योजना शिवानंद यांनी दिली.
हा कार्यक्रम वांद्रे (पश्चिम) मुंबई येथील ग्रंथाली प्रतिभांगण येथे होणार आहे. या निमित्ताने ‘भगवान गौतम बुद्ध – स्वरवंदना’ ही गायन मैफिल रंगणार आहे. या मैफिलीची संकल्पना, संहिता, निरूपण लेखन आणि गायन योजना शिवानंद यांचे आहे. त्यांच्यासोबत कुमारी अनन्या गोखले हिचे गायनही होणार आहे. डॉ. मृण्मयी भजक निवेदन करणार आहेत.
सुमारे 40 वर्षांपूर्वी, योजना प्रतिष्ठान निर्मित या नाटकाचा प्रथम प्रयोग नागपूर येथे झाला होता. जगाला अहिंसा आणि शांततेचा महान संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धांच्या जीवन तत्त्वज्ञानावरील या नाट्यकृतीला रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. भगवान गौतम बुद्ध या नाटकाच्या 50 व्या प्रयोगाला (1983) योजना प्रकाशनतर्फे या नाटकाचे पुस्तक शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे प्रकाशित झाले होते. अनोख्या विषयावरील हे वेगळे नाटक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ या ग्रंथावर आधारित आहे.
योजना प्रतिष्ठाननिर्मित भगवान गौतम बुद्ध या नाटकात प्रसिद्ध गायिका योजना शिवानंद यांनी नायिका यशोधरेची भूमिका साकारली होती. डॉ. नितीश भारद्वाज यांनी या नाटकात नायक सिद्धार्थाची भूमिका केली होती. पुढे दूरदर्शनवरील महाभारत या अफाट गाजलेल्या मालिकेतून त्यांनी भगवान कृष्णाची भूमिका केली आणि त्यांना खूप लोकप्रियता मिळाली. या नाटकाच्या पुस्तकाला प्रतिभावान लेखक प्रल्हाद जाधव यांनी प्रस्तावना लिहिली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनी भगवान गौतम बुद्ध या नाटकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित होत आहे, याचा आनंद आहे, असे योजना शिवानंद यांनी सांगितले




























































