घरातील कामे करा.. तंदुरुस्त राहा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वजन कमी करण्यासाठी किंवा स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी लोक काही ना काही उपाय करत असतात. तसेच स्पेशल डायटच्या मदतीने जिम लावण्यापर्यंतच्या सर्व गोष्टी लोक करतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, घरातील ही 6 कामे केल्यावर तुम्ही सडपातळ आणि फिट राहू शकतात.

1) लादी पुसणे
लादी पुसणे हे अंग मेहनतीचे काम असते. हे काम करताना व्यक्तीची उठ बस होत असल्याने पायांचा व्यायाम होत असतो. तर कंबरेची सातत्याने हालचाल होत असल्याने कंबरेचासुद्धा व्यायाम होण्यास मदत होते. 20 मिनिटे लादी पुसण्याचे काम केल्यास 150 कॅलरीज कमी होतात.

2) भांडी घासणे
स्वयंपाकासाठी, जेवणासाठी लागणारी भांडी घासणे हे घरातील मुख्य काम असते. मोठी पातेली, ताटे, कढया घासल्याने हाताला चांगला व्यायाम होतो. पाठीच्या, कंबरेच्या स्नायूंची चांगली हालचाल होते. मुख्यत: भांडी घासण्याचे काम केल्यास 125 कॅलरीज कमी होतात. तसेच शरीरातील वाढीव कॅलरीज कमी होण्यासही मदत होतो.

3) स्वत: जेवण बनविणे
आपल्या घरच्यांसाठी, स्वत:साठी स्वयंपाक करणे यासारखा परमानंद नाही. सगळे पौष्टिक घटक वापरले जातात, तेलाचा योग्य वापर केला जातो. शिवाय खाली बसून नारळ खवणे, विळीवर भाजी चिरणे, पोळ्या करणे, सतत उठबस यामुळे 100 कॅलरीज सुद्धा कमी होतात.

4) साफसफाई करणे
घरामध्ये साफसफाई करणे जास्त कोणाला आवडत नाही. तर घरातील काम करणाऱ्या मावशी किंवा काका येऊन काम करण्यापेक्षा हे काम स्वत:हून केले उत्तम. त्यामुळे शरीराची हालचाल होत राहते आणि ५०० कॅलरीज कमी होतात.

5) पीठ मळणे
तुम्हाला माहिती आहे का, पोळीसाठी पीठ मळणे हे किती आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या कामामध्ये सतत हाताची हालचाल होत असल्याने शरीरातील 50 कॅलरीज कमी होतात.

6) कपडे धुणे
सध्या कपडे धुण्यासाठी बाजारात विविध पद्धतीच्या वॉशिंग मशीन उपलब्ध आहेत. मात्र तुम्हाला हाताने कपडे धुण्याची सवय असेल तर त्याचा फायदा शरीराला होतो. तसेच 130 कॅलरीज या कामामुळे कमी होतात.