
ओशिवरा नाला लिंक रोड परिसरात मोठय़ा प्रमाणात लोकवस्ती वाढत आहे. या भागातील नागरिक, शाळकरी मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ज्येष्ठांना रस्ता ओलांडून शाळा, मार्केट, कॉलेज आणि इतर कामांसाठी जावे लागते. महाविकास आघाडीचे सरकार असताना एमएमआरडीएशी बोलून या ठिकाणी चार सरकत्या जिन्यांचा पादचारी पूल बनविण्याचा प्रस्ताव माजी मंत्री, आमदार सुभाष देसाई यांनी दिला होता. त्यावेळी तो मान्यदेखील झाला होता, मात्र अद्याप त्यावर कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे या पुलासाठी आता शिवसैनिक आक्रमक झाले असून आंदोलन करण्याचा इशारा सुभाष देसाई यांनी दिला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शाखा क्रमांक 57 मध्ये आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
गोरेगाव पश्चिम येथील ओशिवरा नाला लिंक रोडपासून इनऑर्बिट मॉल पादचारी पुलाची मागणी नागरिक करीत आहेत. येथील भगतसिंग नगर, इंदिरा नगर, लक्ष्मी नगर, बांगूर नगर 1 आणि 2 मध्ये राहणाऱया नागरिकांना या पादचारी पुलाची गरज आहे. त्यामुळे प्रस्तावित पुलाचा निर्णय न झाल्यास त्यासाठी आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे देसाई याप्रसंगी म्हणाले. या मेळाव्याला सुभाष देसाई यांच्यासह आमदार व विभागप्रमुख सुनील प्रभू, उपनेते अमोल कीर्तिकर यांच्यासह विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे, समीर देसाई, विधानसभा उपसमन्वयक अजय नाईक, विधानसभा संघटक अन्नू मलबारी, दिनेश बोहरा, माजी नगरसेविका प्रमिला शिंदे, युवासेना विभाग अधिकारी रोहन शिंदे, उपविभागप्रमुख लक्ष्मण नेहरकर, उपविभाग समन्वयक गायत्री वारीसे, उपविभाग सहसमन्वयक चित्रा मिठबावकर, युवासेना सहसचिव रोनक देसाई, उत्तर भारतीय मंचचे प्रेम विश्वकर्मा उपस्थित होते. सदर मेळावा विधानसभा संघटक माजी नगरसेवक दिलीप शिंदे, शाखाप्रमुख भरत बोऱहाडे, शाखा संघटक शोभना सकपाळ यांनी आयोजित केला होता.
सिनेट निवडणुकीसाठी पदवीधरांनी नोंदणी करावी – अमोल कीर्तिकर
मुंबई विद्यापीठाच्या होऊ घातलेल्या सिनेट निवडणुकीसाठी जास्तीत जास्त पदवीधरांनी मतदार म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन यावेळी उपनेते अमोल कीर्तिकर यांनी केले. त्यांनी या वेळी सिनेट निवडणुकीची माहितीही लोकांना दिली, तर माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी शिवसैनिकांनी कोरोनाच्या वेळी केलेली कामे, महापालिकेने मुंबईसाठी केलेली मोठमोठी कामे यांचा पाढा वाचून दाखविला. त्यात रुग्णालये, शाळा, बाजारपेठ, शवविच्छेदन केंद्र, पूल, रस्ते यांची कामे करण्यात आल्याचे सांगितले.
राज्यपालांनी राजीनामा द्यावा – सुनील प्रभू
महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वारंवार अवमानकारक भाषा वापरणाऱया राज्यपालांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी विभागप्रमुख, आमदार सुनील प्रभू यांनी दिली. तसेच यापुढे राज्यात पुन्हा एकदा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार येईल, असेही त्यांनी सांगितले.
































































