‘विक्रम-एस’ – हिंदुस्थानचा एक महत्त्वाचा टप्पा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ब्रिगेडियर हेमंत महाजन ([email protected])

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोने (Indian Space Research Organisation) ISRO) आणखी एक इतिहास रचला आहे. 25 नोव्हेंबरला हिंदुस्थानने पहिले खासगी ‘रॉकेट विक्रम-एस’ श्रीहरीकोटा येथून लाँच केले. सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात झेपावले. हिंदुस्थानसाठी हे फार मोठे आणि महत्त्वाचे पाऊल आहे. 550 किमी वजनाचे हे सिंगल स्टेज स्पिन स्टेबलाइज्ड सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट आहे. ‘विक्रम-एस’च्या साहाय्याने तीन उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. या मोहिमेमुळे देशाने अवकाश संशोधनात खासगी क्षेत्राने प्रवेश केला आहे.

हैदराबाद येथे चार वर्षांपूर्वी सुरू झालेली स्टार्टअप कंपनी ‘स्कायरूट एरोस्पेस’ने ‘विक्रम-एस’ हा हिंदुस्थानचा खासगी क्षेत्रातील पहिला अग्निबाण विकसित केला आहे. हिंदुस्थानच्या अवकाश संशोधन कार्यक्रमाचे पितामह विक्रम साराभाई यांच्या नावावरून या प्रक्षेपकाचे नाव ‘विक्रम’ ठेवण्यात आले आहे. ‘प्रारंभ’ असे नाव असलेल्या पहिल्याच मोहिमेत हा संपूर्ण स्वदेशी अग्निबाण यशस्वी ठरला आहे. केंद्र सरकारने 2020 मध्ये अवकाश क्षेत्र खासगी कंपन्यांसाठी खुले केले. या मोहिमेद्वारे ‘स्कायरूट एरोस्पेस’ ही अवकाश प्रक्षेपणाच्या क्षेत्रातील हिंदुस्थानातील पहिली खासगी कंपनी ठरली आहे. अंतराळ झेप आपण यापूर्वीही घेतली असली तरी, हे खासगीरीत्या तयार केलेले पहिलेच हिंदुस्थानी रॉकेट आहे आणि भारतीय स्टार्ट-ऍपच्या मोठय़ा सहभागासाठी हिंदुस्थानी अंतराळ कार्यक्रम खुला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धरलेल्या आग्रहाचा परिणाम आहे. उपग्रह यशस्वीपणे अवकाशात सोडल्यानंतर ‘विक्रम-एस’ सुरक्षितपणे समुद्रात उतरले. हिंदुस्थानला या मोहिमेत यश मिळाल्याने खासगी अवकाश रॉकेट प्रक्षेपण क्षेत्रात जगातील आघाडीच्या देशांमध्ये हिंदुस्थानचे नाव सामील झाले. या यशस्वी प्रक्षेपणानंतर पुढील वर्षभरात ‘विक्रम-1’ची निर्मिती करून त्याला पृथ्वीच्या कक्षेत प्रस्थापित करण्यात येणार आहे. येत्या दोन-तीन महिन्यांत ‘अग्निकुल कॉसमॉस’ या आणखी एका खासगी कंपनीच्या रॉकेटचे उड्डाण नियोजित आहे.

चेन्नईतील अवकाश स्टार्टअप ‘स्पेसकिड्झ’, आंध्र प्रदेशमधील ‘एन-स्पेसटेक’ हे दोन हिंदुस्थानी आणि आर्मेनियातील ‘बाझूम क्यू स्पेस रिसर्च लॅब’च्या कंपनीच्या एका उपग्रहाचा समावेश, ‘स्पेसकिड्झ’चा ‘फनसॅट’ या उपग्रहाचे वजन 2.5 किलो असून ही अमेरिका, इंडोनेशिया, सिंगापूर, सेशेल्स आणि हिंदुस्थानातील मुलांची निर्मिती आहे.‘फनसॅट’मध्ये 80 पेक्षा जास्त सुटे भाग आहेत.

सध्या खासगी क्षेत्राची भूमिका विस्तारली आहे. एकेकाळी उपग्रहांची मालकी फक्त सरकारकडे होती, पण आज खासगी कंपन्या उपग्रह व्यवसायात आघाडीवर आहेत. ब्रॉडबँड इंटरनेटसह अनेक सेवा देण्यासाठी ‘मेझॉन’च्या ‘प्रोजेक्ट कुइपर’ने येत्या काही वर्षांत तीन हजारांहून अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची योजना आखली आहे. यासाठी दिवसाला किमान तीन उपग्रह तयार करावे लागतील. हिंदुस्थानातील ‘एअरटेल’ ही ‘वनवेबकॉर्पोरेशन’मध्ये भागीदार असून या ‘वनवेब’चे सध्याचे जवळपास 500 उपग्रह इंटरनेट सेवा पुरवण्यासाठी कार्यरत आहेत.

शीतयुद्धाच्या काळात अमेरिका आणि तत्कालीन सोव्हिएत रशिया यांचा अंतराळ कार्यक्रम अत्यंत स्पर्धेचा होता. मित्र जिंकण्याच्या आणि राष्ट्रांना प्रभावित करण्याच्या शीतयुद्धाच्या रणनीतीचा भाग म्हणून दोन्ही बाजूंनी इतर देशांसोबत अंतराळ सहकार्यात गुंतले होते. मात्र आता (अमेरिका आणि सोव्हिएत रशिया) अंतराळात द्विपक्षीय सहकार्य करत आहे. युरोपीय संघाने ‘युरोपियन स्पेस एजन्सी’ विकसित करण्यासाठी देशांना एकत्र आणले. ही युरोपीय अंतराळ संस्था आता बाह्य अवकाशातील एक प्रमुख शक्ती आहे. हिंदुस्थानसह इतर अनेक देशांनी राष्ट्रीय अवकाश कार्यक्रम सुरू केला. राष्ट्रीय विकासाला गती देण्यासाठी बाह्य अवकाशाचा लाभ घेणे हे आपले मुख्य उद्दिष्ट होते, परंतु आपल्याही अंतराळ कार्यक्रमाला लष्करी आणि व्यावसायिक परिमाणे आहेतच. हिंदुस्थानच्या अंतराळ कार्यक्रमाची सुरुवात पाश्चात्य देशांशी आणि नंतर सोव्हिएत युनियनच्या सहकार्याने झाली, पण पुढल्या काळात हिंदुस्थानने इतर विकसनशील देशांनाही (भुतान आणि हिंदुस्थानचे शेजारी देश) अंतराळ सहकार्याचा हात दिला आहे.

हिंदुस्थान आता अंतराळाशी संबंधित वस्तू आणि तंत्रज्ञानातील व्यापारी व्यवहारांना नियंत्रित करणाऱ्या आंतरराष्ट्रीय समझोत्याचा घटक आहे. हिंदुस्थान ‘वासेनार व्यवस्थे’चा घटक आहे, जी नागरी आणि लष्करी दोन्ही हेतूंसाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाच्या व्यापारावर नियंत्रण ठेवते.

हिंदुस्थानने चार अत्यावश्यक बाबींकडे लक्ष पुरवले आहे. एक म्हणजे नवीन अवकाश शक्यतांची वाढती श्रेणी – ब्रॉडबँड इंटरनेट वितरित करण्यासाठी उपग्रह वापरण्यापासून ते चंद्राच्या खाणकामापर्यंत आणि अंतराळ निर्मितीपासून ते खोल अंतराळ संशोधनापर्यंत. त्यामुळेच हिंदुस्थानसाठी बाह्य अवकाश यापुढे ‘विकास’ आणि ‘राष्ट्रीय प्रतिष्ठा’ कल्पनांमधून बाहेर पडून व्यावसायिक आणि अर्थव्यवस्था-विकासाच्या शक्यतांकडे झेपावते आहे. जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेत सध्याचा हिंदुस्थानचा वाटा दोन टक्के आहे. येत्या काही वर्षांत हिंदुस्थानचा वाटा झपाटय़ाने आठ टक्क्यांपर्यंत वाढवण्याची अपेक्षा सरकारने ठेवली आहे.

हिंदुस्थानने बाह्य अवकाशात आपल्या खासगी क्षेत्राचे योगदान वाढवण्याचा ‘प्रारंभ’ करणाऱ्या स्टार्टअप्सना पाठिंबा देण्यासाठी परदेशी भांडवलही आकर्षित करण्याची पावले टाकली आहेत. सिंगापूरचा ‘जीआयसी’ हा निधी ‘विक्रम-एस’ रॉकेट यशस्वी करणाऱ्या ‘स्कायरूट एअरोस्पेस’ या खासगी कंपनीमधील एक प्रमुख गुंतवणूकदार आहे. अनेक पाश्चात्य एरोस्पेस कंपन्या हिंदुस्थानच्या अंतराळ कार्यक्रमात गुंतवणूक करण्यास उत्सुक आहेत. जागतिक अवकाश अर्थव्यवस्थेतील हिंदुस्थानी वाटा वाढवणे हे खासगी क्षेत्रातील कंपन्यांना मोठी भूमिका बजावण्यासाठी आकर्षित करूनच केले जाऊ शकते. ‘विक्रम-एस’ रॉकेटचे – म्हणजे उपग्रह वाहक यानचे – प्रक्षेपण 18 नोव्हेंबर रोजी करण्यात आले. हा हिंदुस्थानच्या अंतराळ प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. विक्रमची ‘प्रारंभ’ मोहीम ही एक चांगली सुरुवात असली तरी अंतराळ कार्यक्रमांमध्ये खासगी क्षेत्राच्या सहभागाबाबत उर्वरित जगाच्या तुलनेने हिंदुस्थानला बरेच अंतर पार करायचे आहे, मात्र देशाने सक्षम धोरणात्मक वातावरण तयार केल्यास ते अंतर कमी करण्याची क्षमता आणि अनुभव देशाच्या खासगी क्षेत्राकडे आहे.