
‘अर्जुन’ पुरस्कारप्राप्त आणि बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता ‘शटलर’ लक्ष्य सेनवर स्थानिक स्पर्धांमध्ये वय कमी करून भाग घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. बंगळुरूमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बंगळुरूमध्ये बॅडमिंटन अकादमी चालवणाऱया नागराज एमजी या व्यक्तीने खरे वय लपवून स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल लक्ष्य, त्याचे प्रशिक्षक विमल कुमार, त्याचे वडील धीरेंद्र सेन, त्याचा भाऊ चिराग आणि आई निर्मला सेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिराग स्वतः बॅडमिंटनपटू आहे आणि धीरेंद्र हिंदुस्थानी क्रीडा प्राधिकरणात प्रशिक्षक आहेत.
प्रशिक्षक विमल यांनी लक्ष्यच्या आई-वडिलांच्या संगनमताने 2010 मध्ये जन्म प्रमाणपत्र तयार केले होते, ज्यामध्ये चिराग आणि लक्ष्य यांच्या वयात हेराफेरी केली. त्यामुळे त्याला वयोगटातील स्पर्धांमध्ये भाग घेता आला. नाही तर तो स्पर्धेसाठी अपात्र ठरला असता, असा दावा नागराज यांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.































































