इक्बाल शेख निवडणुकीच्या रिंगणात, एमसीए उपाध्यक्षपदासाठी भरला अर्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मुंबई क्रिकेट संघटनेच्या त्रैवार्षिक निवडणूकीत उपाध्यक्षपदासाठी एकही अर्ज न आल्यामुळे लांबलेली निवडणूक येत्या 9 डिसेंबरला होतेय आणि या पदासाठी इक्बाल शेख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या पदासाठी केवळ दोनच अर्ज आले असून उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. जर दोनपैकी एक अर्ज मागे घेण्यात आला तर उपाध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध होईल.

दीड महिन्यांपूर्वी झालेल्या एमसीएच्या निवडणुकीत शरद पवार-आशीष शेलार गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित करताना 13 पैकी दहा जागा जिंकल्या होत्या. विशेष म्हणजे अध्यक्ष,सचिव आणि कोषाध्यक्ष ही महत्त्वाची पदे पवार-शेलार गटाने जिंकली होती. मात्र तेव्हा उपाध्यक्षपदाची निवड झाली नव्हती. ती आता होत असून एमसीएचे माजी कार्यकारिणी सदस्य तसेच निवृत्त पोलीस उपायुक्त इक्बाल शेख उपाध्यक्षपदासाठी आपले भाग्य आजमावात आहेत. गेली तीन दशके ते क्रिकेटच्या माध्यमातून एमसीएशी जोडले गेले असून आता आपला अनुभव मुंबई क्रिकेटसाठी देण्याच्या ध्येयाने उपाध्यक्षपदाची निवडणूक लढवित आहेत.