
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केल्याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आंदोलकांवर जीवे मारण्याचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, मानहानी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समता सैनिक दलाचे संघटक मनोज घरबडे, सदस्य धनंजय इजगज आणि वंचित बहुजन आघाडीचे सचिव विजय ओव्हाळ अशी अटक केलेल्या आंदोलकांची नावे आहेत. त्यांना पिंपरी न्यायालयात हजर केले असता 14 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
पत्रकाराची दिवसभर चौकशी
शाईफेकप्रकरणी चिंचवड पोलिसांनी ‘न्यूज 18 लोकमत’ या वृत्तवाहिनीचा पत्रकार गोविंद वाकडे याची दिवसभर चौकशी केली. त्याला उद्या पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. चंद्रकांत पाटील यांनी आज सकाळी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना या पत्रकाराला ताब्यात घ्यावे अशी मागणी केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई केली. यावर राज्यातील सर्व पत्रकार संघटनांनी या कारवाईचा निषेध केला. अखेर गोविंद वाकडे याला अटक न करता केवळ चौकशी करून पोलिसांनी सोडून दिले.
शाई फेकताना बरोबर अँगलने पह्टो निघतो कसा. हा कोण पत्रकार आहे. त्याला हा अँगल कसा मिळाला, त्याने तो सगळीकडे पसरवला कसा असा सवाल उपस्थित केला. तसेच पोलिसांचा सायबर विभाग अॅक्टीवेट करण्याची मागणी केली. उद्या सकाळपर्यंत या पत्रकाराचा शोध नाही घेतला तर मी पिंपरी-चिंचवडला पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसेन, असा इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.
शाईफेक प्रकरणाच्या कारवाईत कोणावर अन्याय नको
‘कोणी मोठी व्यक्ती असली की, त्याला एक्स, वाय सुरक्षा दिली जाते, कुठल्या व्यक्तीवर अशी शाईफेक करू नये, वैचारिक मतभेद असतील, पण कायदा हातात कोणी घेऊ नये, आपण बोलताना कोणाला त्रास होणार नाही, शालजोडीतील शद्ब वापरता येतात, पण कालची गोष्ट चुकीचीच होती, आपण बोलताना तारतम्य बाळगलं पाहिजे’, असे सांगून अजित पवार म्हणाले, ‘‘शाईफेक प्रकरणात कारवाई करावी, पण कोणावर अन्याय होऊ नये, निष्पाप व्यक्तीवर कारवाई करू नये.’’
हा कायद्याचा गैरवापर; आरोपींची केस मोफत लढणार – सरोदे
शाइफेक प्रकरणी कलम 307 म्हणजे जीवे मारण्याचा प्रयत्न करणे आणि 120 ब, आर्म्स अॅक्टचा वापर अतिरेकीपणा आहे. यंत्रणांच्या मदतीने कायद्याच्या गैरवापराचे हे उदाहरण आहे. त्यामुळे आमची लीगल टीम आरोपींची केस मोफत चालवेल, असे अॅड. असिम सरोदे यांनी सांगितले. शाईफेकीचा व बेताल वक्तव्य करणाऱयांचा सरोदे यांनी निषेध केला.
पोलीस निरीक्षकासह दहा कर्मचारी निलंबित
पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी एक पोलीस निरीक्षक, दोन फौजदारांसह 10 कर्मचाऱयांचे निलंबन केले आहे. त्यांच्यावर कर्तव्यात निष्काळजीपणा तसेच शिस्तभंगाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
खुनी हल्ल्याचे कलम लावणे चुकीचे
पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शनिवारी शाई फेकण्याची घटना घडली. या प्रकाराचे समर्थन करणार नाही. पण असे का आणि कशामुळे घडले, याचाही विचार करायला हवा. जोतिबा फुले यांनी भीक मागितली, असे विधान न शोभणारे आहे. शाई फेकली म्हणून माणूस काय मरतो काय? आंदोलकांवर खुनी हल्ल्याचे कलम लावणे चुकीचे आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली.





























































