निळवंडे कालव्यांची कामे बंद करणे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

निळवंडेच्या कालव्यांची कामे बंद करणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखे असल्याची टीका आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. दरम्यान, कालव्यांची कामे लवकरात लवकर झाली पाहिजेत. निळवंडेचे पाणी दुष्काळग्रस्तांच्या शेतात गेले पाहिजे यासाठी आपला कायम आग्रह राहणार असल्याचेही ते म्हणाले.

अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱयांच्या सत्कारावेळी आमदार थोरात बोलत होते. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, ऍड. माधवराव कानवडे, दुर्गा तांबे, रणजितसिंह देशमुख, डॉ. जयश्री थोरात, राज्य सहकारी साखर संघाचे उपाध्यक्ष बाबा ओहोळ, आर. बी. राहणे आदी उपस्थित होते.

आमदार थोरात म्हणाले, निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला देणे हे आपले जीवनाचे ध्येय आहे. अनंत अडचणींवर मात करून निळवंडे धरण पूर्ण झाले. बोगद्यांची कामे मार्गी लागली. 2014 ते 19 काळात कालव्यांची कामे थंडावली होती. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर 2019 नंतर कालव्यांच्या कामांना गती मिळाली. ऑक्टोबर 2022 मध्येच दुष्काळी भागातील शेतकऱयांच्या शेतात निळवंडेचे पाणी देण्यासाठी आपण काम सुरू ठेवले होते. मात्र, जूनमध्ये सत्तांतर झाले आणि कालव्यांची कामे थांबली. हा प्रकार म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नात माती कालविण्यासारखा प्रकार असल्याचा टोला त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला लगावला.